मानवी एकाकीपणा आणि संशयाचा खेळ उलगडणारे ः दास्तां

मानवी एकाकीपणा आणि संशयाचा खेळ उलगडणारे ः दास्तां

Published on

Rat26p6.jpg-
P26O27334
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेत सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान लातूर या संस्थेने केलेल्या ‘दास्ताँ ’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
-----
एकाकीपणा अन् संशयाचा खेळ उलगडणारे ः दास्ताँ
लातूरच्या स्मृती प्रतिष्ठानचे सादरीकरण; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता २५ ः अनोळखी व्यक्तींमधील संवादातून उलगडणारे आयुष्याचे सत्य, एकटेपणा आणि मानवी नात्यांची गुंतागुंत तसेच समाजात स्त्री-पुरुष एकत्र दिसले की, निर्माण होणारे संशय आणि असुरक्षिततेची भावना यावर ‘दास्ताँ’ या नाटकाची संहिता भाष्य करते. लेखक डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी हे नाटक लिहिले आहे. दिग्दर्शक महेश सबनीस यांच्या संकल्पनेतून रंगलेले हे नाटक सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान लातूर यांनी सादर केले.
------
‘दास्ताँ’ हे दोनअंकी नाटक रेल्वेस्टेशनवर घडणाऱ्या एका अनोख्या भेटीभोवती फिरते. ठाकूरवाडी रेल्वेस्टेशनवर एक स्त्री (ती) ट्रेनची वाट पाहत बसलेली असते. तेवढ्यात एक पुरुष (तो) येतो आणि दोघांमध्ये साध्या गप्पांपासून संवादाला सुरुवात होते. सुरुवातीला अनोळखी असलेले हे दोघे हळूहळू आपल्या आयुष्यातील गोष्टी एकमेकांसमोर मांडू लागतात. ती स्वतःला पोलिस इन्स्पेक्टरची पत्नी असल्याचे सांगते तर तो संशोधक असल्याचे सांगतो; मात्र पुढील संवादात दोघेही आपापल्या आयुष्यातील खऱ्या वेदना उघड करतात. तो सांगतो की, त्याचे आई-वडील अपघातात गेले. मामाने त्याचे लग्न जबरदस्तीने लावले; पण वैवाहिक आयुष्य सुखाचे नाही. तो गावोगावी कपडे विकून उदरनिर्वाह करतो. ती देखील कबूल करते की, तिने सुरुवातीला खोटे सांगितले. ती आरोग्यकेंद्रात काम करते. आईसोबत राहते आणि एकटी प्रवास करते.
रात्री उशिरा स्टेशनवरील ‘वेटिंग रूम’ बंद असल्याने दोघे जवळच्या लॉजमध्ये थांबतात. तिथे गैरसमज निर्माण होतो आणि ती त्याच्यावर संशय घेते. त्यानंतर तिला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती त्याची माफी मागते. सकाळी दोघे पुन्हा आपापल्या मार्गाने निघतात. शेवटी तो तिचे नाव विचारतो तेव्हा ती म्हणते, ‘माझे नाव काय करायचे तुम्हाला? सध्या कल्पना समजा.’ आणि ती निघून जाते. नाटक अशा अनिश्चित, खुल्या शेवटावर संपते. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही वेदना, अपूर्णता आणि संघर्ष घेऊन जगत असतो, हे नाटक अधोरेखित करते.
----------------------------
सूत्रधार आणि सहाय्य

प्रकाश योजना- बळवंत देशपांडे, संगीत-सुधीर कन्नडकर, नेपथ्य- अभिजित जोंधळे, रंगभूषा- अश्विनीकुमार देशपांडे, दीपाली देशपांडे, वेशभूषा- अनिकेत डिघोळकर, मधुरा सबनीस. रंगमंच व्यवस्था– नितीन बेळुर्गीकर, संकेत तोरंबेकर, दीपक देवगावकर, दीपाली बेळुर्गीकर.
------------------
पात्र परिचय
ती- कल्पना महाजन-देशपांडे, तो- अमृत महाजन.

Marathi News Esakal
www.esakal.com