नगराध्यक्षांनी भावनिक राजकारण करू नये
swt2618.jpg
27382
सावंतवाडी ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब. बाजूला परीक्षित मांजरेकर.
नगराध्यक्षांनी भावनिक राजकारण करू नये
संजू परब ः चुकीच्या प्रत्येक गोष्टीला विरोध राहणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः नगरपरिषदेतील चुकीच्या प्रत्येक गोष्टीला माझा विरोध राहणार आहे, त्यामुळे उगाच नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी भावनिक राजकारण करू नये. नगराध्यक्षांना ऑनलाईन उपस्थित राहायचे होते, तर तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाने आम्हाला आगाऊ दिल्या पाहिजे होत्या. अचानक काहीतरी वेगळे कराल तर आम्ही ते कदापी करू देणार नाही, असा इशारा नगरसेवक तथा शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे दिला.
नगरपरिषदेच्या अलीकडेच झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये ऑनलाईन उपस्थित राहिलेल्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांना नगरसेवक परब यांनी विरोध करत ऑनलाईन सिस्टीम बंद पाडण्यास सांगितले होते. एकूणच या विषयावरच नगराध्यक्ष भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपला पर्यायाने सावंतवाडीकरांचा अपमान झाल्याचा दावा केला होता. श्री. परब यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांच्यासोबत परीक्षित मांजरेकर उपस्थित होते.
श्री. परब म्हणाले, ‘‘नगराध्यक्षा श्रद्धा भोसले या आपण ‘लोकनियुक्त’ असल्याचा दावा वारंवार करत आहेत, मात्र आम्हालाही जनतेनेच निवडून दिले आहे, आम्ही काही असेच आलो नाही. त्यांनी विकासाच्या केवळ गप्पा मारण्यापेक्षा सावंतवाडी पालिकेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे. विशेषतः शहराचा अग्निशमन बंब वारंवार बंद पडतो, तो दुरुस्त करण्यासाठी त्यांना अद्याप वेळ मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून आधी मूलभूत प्रश्न सोडवा आणि मगच आमच्यावर बोला. मुळात नगराध्यक्षा या सुटीवर असताना प्रभारी नगराध्यक्षांकडे भार सोपवल्यानंतर माझ्या दृष्टीने त्यांनी मासिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे चुकीचे होते; मात्र सभा शास्त्रानुसार मी विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशासन म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी तसेच प्रभारी नगराध्यक्षांनी यावर मला अपेक्षित उत्तर दिले पाहिजे होते, परंतु त्यांनी तसे न करता ऑनलाईन सिस्टीम बंद पाडली. एकूणच प्रभारी नगराध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता. ते एक वकील आहेत. त्यामुळे सभा शास्त्रानुसार त्यांनी योग्य तेच केले. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, परंतु ही सिस्टीम बंद पाडण्यामागे कोणाला अपमानित करणे हा आमचा उद्देश नव्हता. केवळ भावनिक राजकारण करणे नगराध्यक्षा भोसले यांनी सोडावे, कारण चुकीच्या गोष्टींना माझा शंभर टक्के विरोध राहणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ऑनलाईन सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष भोसले उपस्थित राहणार या संदर्भात प्रशासनाकडून आम्हाला तशा प्रकारची आगाऊ सूचना देणे गरजेचे होते, परंतु कोणीही तशा प्रकारची आगावू सूचना आम्हाला दिली नाही. कोणीतरी अचानक येऊन काहीतरी वेगळे करत असेल तर आम्ही ते कदापी खपवून घेणार नाही.’’
चौकट
वृत्तपत्राच्या बातम्या फेसबुक पेजवर नको
‘सुंदरवाडी सावंतवाडी’ हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज शहरातील विकासकामांची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी वृत्तपत्रांच्या बातम्या टाकून कोणी राजकारण करू नये. यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, असे आवाहन यावेळी परब यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

