एनएमएमएस परीक्षेत आचरा प्रशालेचे यश

एनएमएमएस परीक्षेत आचरा प्रशालेचे यश

Published on

एनएमएमएस परीक्षेत
आचरा प्रशालेचे यश
आचरा ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचराच्या नऊ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. यात वैष्णवी पेडणेकर, स्वरा तळवडकर, आविष्कार म्हमाणे, कौशल भोसले, आयुष मांजरेकर, दिव्या खोत, गौरी साटम, कृत्तिका आईर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित मुंबईचे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
.................
साहित्य प्रेरणा कट्ट्याचा
आज मासिक कार्यक्रम
सावंतवाडी ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग मासिक चौसष्ठावा कार्यक्रम उद्या (ता. २७) सायंकाळी ५ वाजता शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयात आयोजित केला आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आखलेल्या ''विशाखाचा वर्षाव'' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्याचा वेध घेण्यात येईल. या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याचे सदस्य शिरवाडकर यांच्या कविता, नाटके, ललित लेखन, कथा, कादंबरी याविषयी बोलतील. खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर व ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी केले आहे.
...................
१,०२९ उमेदवारांची
शिपाई भरतीला दांडी
ओरोस ः सिंधुदुर्गनगरी पोलिस मुख्यालय कवायत मैदानावर सुरू पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत गेल्या चार दिवसांत मोठ्या संख्येने उमेदवारांनी अनुपस्थिती दर्शविली आहे. २० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्लाय या मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांपैकी तब्बल १,०२९ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. या पोलिस शिपाई पदासाठी २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत एकूण ३,३८३ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात मैदानावर केवळ २,३५४ उमेदवारांनी हजेरी लावली. उर्वरित १,०२९ उमेदवार अनुपस्थित राहिल्याने ही पदे मिळवण्यासाठी असलेली स्पर्धा काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. उंची व छाती मोजमापात २२३ उमेदवार बाद ठरले असून मैदानी चाचणीच्या सुरुवातीलाच उमेदवारांच्या शारीरिक पात्रतेची तपासणी करण्यात येत आहे.
.....................
कसाल येथे आजपासून
अखंड हरिनाम सप्ताह
कुडाळ ः कसाल गांगोचीराई मठ येथे उद्या (ता. २७) सकाळी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता घटस्थापना, आरती, सकाळी ११ पासून भजने, रात्री ९ वाजता गांगेश्वर भजन मंडळ-बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांचे भजन, १०.३० वाजता देवगड येथील पावणाई वारकरी भजन मंडळ, किंजवडे-परबवाडी यांचे वारकरी दिंडी भजन तसेच शनिवारी (ता. २८) दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसाद होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन गांगोचतीराई मठ ग्रामस्थांनी केले आहे.
.......................
कलमठला उद्यापासून
सांस्कृतिक कार्यक्रम
कणकवली ः कलमठ-बाजारपेठ येथील पिंपळपार येथे शिवतेजा मित्रमंडळाने शनिवार (ता. २८) व रविवारी (ता. १) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात शनिवारी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १२.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजन, रात्री ९.३० वाजता शिवतेजा मित्रमंडळ निर्मित ''कल्लीवट्टी'' नाट्य, रविवारी रात्री ९.३० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर व कार्यकारिणीने केले आहे.
.........................
शिवडाव येथे आज
हरिनाम सप्ताह
कणकवलीः शिवडाव-ओटोसवाडी येथील श्री देव भूतनाथचा अखंड हरिनाम सप्ताह उद्या (ता. २७) व शनिवारी (ता. २८) मांडकार देवालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. उद्या सकाळी ९ वाजता घटस्थापना, त्यानंतर अखंड नामस्मरण तसेच सुस्वर भजने होणार आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. नवस बोलणे, फेडणे, तीर्थप्रसाद या कार्यक्रमानंतर रात्री ८ वाजता भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल. लाभ घेण्याचे आवाहन ओटोसवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com