दुर्गम भागात शिक्षण परिषद

दुर्गम भागात शिक्षण परिषद

Published on

27510


दुर्गम भागात शिक्षण परिषद

चौकुळमध्ये आयोजन; मुख्याध्यापक, शिक्षकांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ : चौकुळ केंद्राची फेब्रुवारीतील शिक्षण परिषद दुर्गम भागातील चौकुळ क्रमांक ४ शाळेत उत्साहात झाली. या परिषदेस केंद्रप्रमुख, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा, अध्यापन पद्धतीतील नवकल्पना, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे उपाय आणि आगामी शैक्षणिक नियोजनावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या शिक्षण परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले ते शाळेचे मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांनी राबवलेला अभिनव स्वागत उपक्रम. परंपरेप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत फुलांनी करण्याऐवजी ‘फूल नको, पुस्तक देऊया’ या संकल्पनेतून सर्व उपस्थितांना पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले. ज्ञानाचा प्रसार आणि वाचन संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रभावी संदेश या कृतीतून देण्यात आला.
यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख तसेच सर्व शिक्षकांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘साऊ’ हे पुस्तक भेट देण्यात आले. स्त्री-शिक्षणाच्या अग्रदूत असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा शिक्षकांना सतत मिळत राहावी, या उदात्त हेतूने ही पुस्तके दिली. शिक्षण परिषद ही केवळ प्रशासकीय बैठक न राहता, मूल्यसंवर्धन आणि सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणारे व्यासपीठ ठरावे, हा संदेश या उपक्रमातून मिळाला आहे. ‘फूल नको, पुस्तक देऊया’ हा संकल्प स्तुत्य असून, तो पुढेही सातत्याने राबवण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख भावना गावडे यांनी केले.
दुर्गम भागातील एका शाळेने घेतलेला हा छोटासा पण अर्थपूर्ण निर्णय निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. ज्ञानाचा सन्मान आणि वाचन संस्कृतीचा प्रसार यासाठी हा उपक्रम एक आदर्श पाऊल ठरत आहे. या परिषदेत डॉ. चंद्रकांत सावंत, अनिता कतगर, गजानन सोमवंशी, गोविंद पाटील, सचिन कोकितकर आणि जावेद तांबोळी यांनी शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेला केंद्रप्रमुख गावडे, केंद्र मुख्याध्यापक शीतल गावडे, गोणसाठ शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ सुतार, मळव शाळेचे मुख्याध्यापक मृणाल देसाई, केगद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील, मराठी बेरडकी शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ हसबे उपस्थित होते. सत्यजित वेतुर्लेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com