आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

Published on

आरोग्य शिबिरात
नागरिकांचा सहभाग
रत्नागिरी ः ‘हिंद की चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये झालेल्या तपासणीत एकूण १ हजार ८६० नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला तर शाळांमध्ये ३३७ बालकांची तपासणी करण्यात आली. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत सर्वसामान्य रुग्णांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत अधिनस्त सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ‘हिंद की चादर’ या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय अधिनस्त ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील २२ शाळांची आरबीएसके पथकामार्फत तपासणी करण्यात आली. एकूण ३३७ बालकांची तपासणी करण्यात आली.

कौशल्य विकासासाठी
९ मार्चपर्यंत प्रस्ताव द्या
रत्नागिरी ः कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील तळागळातील सर्व घटकांपर्यंत पोहचावा व युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार संधी प्राप्त होऊन ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर कमी व्हावे, याकरिता संभाव्य संस्थाकडून ९ मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार (टीपी) यांनी देव्हारे (मंडणगड), जालगाव (दापोली), शिरगाव, नाचणे (रत्नागिरी), पालशेत (गुहागर), भांबेड (लांजा), सागवे (राजापूर), भरणे (खेड), खेर्डी, सावर्डे (चिपळूण), कडवई (संगमेश्वर) यासाठी ९ मार्चपर्यंत दोन प्रतीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी येथे सादर करावयाचे आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक सोनल सावंत यांना संपर्क करावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्र. सहाय्यक आयुक्त दुधाळ यांनी केले आहे.

जनता विद्यालयाचे
१० जण शिष्यवृत्तीस पात्र
संगमेश्वर ः आंगवली विकास मंडळ, मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवली या शाळेतील १० विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) उत्तीर्ण झाल्या असून, त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. एनसीईआरटीमार्फत (NCERT) आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयाचे १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यात तन्वी बेटकर, आराध्य गोरूळे, नेहा पांचाळ, श्रुती भिसे, शुभम घाग, दिशा उंडे, दितेश भिसे, मृणाल लाड, आर्या सरफरे, स्वरा प्रभावळकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना चिंचवलकर, काजरेकर व सूरज जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com