अपूर्ण कारंज्याचे बिल काढणार नाही

अपूर्ण कारंज्याचे बिल काढणार नाही

Published on

27550

अपूर्ण कारंज्याचे बिल काढणार नाही

ॲड. अनिल निरवडेकर ः मोती तलावप्रश्‍नी ठेकेदाराला इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील मोती तलावामध्ये उभारलेला म्युझिकल फाउंटन प्रकल्प अर्धवट आहे. टेंडरनुसार हे काम झालेले नाही. त्यामुळे या अर्धवट कामाची नैतिक जबाबदारी आम्ही घेणार नसून जोपर्यंत पूर्णपणे चांगल्या प्रतीचे काम होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पाचे बिल आम्ही संबंधित ठेकेदाराला अदा करणार नाही, असा निर्णय सत्ताधारी या नात्याने घेतला असल्याचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सत्ताधारी या नात्याने सभागृहात आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही भुयारी गटार योजनेची फाईल हातात घेऊन त्यावर काम सुरू केले आहे. शहरातील ही योजना मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञ समिती नेमून मार्गदर्शन घेतले जाईल. जनतेने ज्या अपेक्षने आम्हाला निवडून दिले, त्याची पोच पावती विकासाच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या पाच वर्षांत देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, पालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज ॲड. निरवडेकर यांनी सादर केला. या अर्थसंकल्पीय सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. निरवडेकर म्हणाले, ‘शहरात सुरू असलेला कारंजा किंवा इतर जी कामे निविदेतील अटींनुसार दर्जेदार झालेली नाहीत, त्यांचे पूर्ण बिल अदा केले जाणार नाही. जोपर्यंत कामाची गुणवत्ता सिद्ध होत नाही, तोपर्यंत पालिका त्याची कोणतीही नैतिक जबाबदारी स्वीकारणार नाही. सद्यस्थितीत उभारण्यात आलेला म्युझिकल फाउंटन हा प्रकल्प प्रशासकीय कार्यकाळात झाला होता. त्यामुळे या कामाच्या बाबतीत सत्ताधारी या नात्याने कुठलीही नैतिक जबाबदारी स्वीकारणार नाही. हे काम अर्धवट स्थितीत असून त्याची मी सविस्तर माहिती घेतली आहे. काही प्रमाणात रक्कम संबंधित ठेकेदाराला अदा केली आहे. मात्र, उर्वरित रक्कम जोपर्यंत टेंडरनुसार काम पूर्णपणे मार्गी लागत नाही, तोपर्यंत अदा केली जाणार नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या मुद्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी मेडिटेशन आणि योगा सेंटरसाठी तरतूद केली आहे. शहरात २०११ पासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेची फाईल पुन्हा उघडली आहे. संपूर्ण शहराचा सूक्ष्म अभ्यास करून या योजनेचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. यासाठी विशेष समिती नेमून या योजनेचा अभ्यास केला जाईल. त्यानंतरच ही योजना मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.’
---------
भटक्या कुत्र्यांच्या समस्येची दखल
ॲड. निरवडेकर म्हणाले, ‘शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. सध्या ९५२ कुत्र्यांचे सर्वेक्षण सुरू असून, १५ दिवसांत स्वतंत्र ऑपरेशन थिएटर आणि डॉक्टरांच्या मदतीने निर्बीजीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होईल. डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी पडून असलेली धुरीकरण यंत्रे तातडीने दुरुस्त करून पुढील ८ ते १० दिवसांत संपूर्ण शहरात फवारणी मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील अग्निशमन बंब नादुरुस्त असून, त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊन लवकर नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध केला जाईल. मिनी अग्निशमन बंब व स्वतंत्र वॉटर टॅंकर खरेदी केला जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com