कळंबुशी ग्रामपंचायतीत ९ लाख ६९ हजारांचा अपहार
कळंबुशी ग्रामपंचायतीत नऊ लाखांचा अपहार
चौकशी अहवाल सादर ; गावपुढारी, एका अधिकाऱ्यावर ठपका
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीचे गावपुढारी आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी ९ लाख ६९ हजार ५३७ रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांना सदर केला असून, त्यात अपहारातील रक्कम दोघांकडून प्रत्येकी ५० टक्के भरून घ्यावी, असे नमूद केले आहे.
कळंबुशी गावातील रहिवासी विजय तुकाराम चव्हाण यांनी संगमेश्वर पंचायत समितीकडे तक्रार केली होती. संबधित कामांची चौकशी व्हावी यासाठी चव्हाण यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही धाव घेतली होती. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, या प्रकरणात सरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अपहार झालेल्या कामांमध्ये बौद्धवाडीसाठी पाखाडी बांधणे व जुनी पाखाडी दुरूस्त करण्यासाठी तरतूद केली होती. ती कामे प्रत्यक्षात झालेली नसल्याचे उघड झाले आहे. तसेच संगणक प्रिंटर खरेदी व दुरूस्ती, पथदीपसाठी रस्त्यावर ब्रॅकेट बसवणे व बिल भरणे, विद्युत व सौरबांधणीची उभारणी, करांडा येथे पाखाडी बांधणे, स्वच्छ भारत अंतर्गत वैयक्तिक कचराकुंड्या वाटप करणे, प्लास्टिक साठवण केज, सार्वजनिक संस्थांमध्ये स्वछतागृह बांधणे, आरोग्य उपकेंद्र साहित्य देणे, अंगणवाडीला साहित्य देणे, आरोग्य उपकेंद्र साहित्य देणे, पाण्याची व्यवस्था व मुख्य इमारत लाईट फिटिंग करणे, ग्रामपंचायत फर्निचर करणे अशा विविध कामांची चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गटविकास अधिकारी यांनी या सर्व कामांमध्ये अपहार झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. ९ लाख ६९ हजार ५३७ रुपयांची वसुली तत्काळ व्हावी आणि संबंधितांनी प्रत्येकी ५० टक्के रक्कम भरावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

