संगमेश्वर- हरकती दाखल

संगमेश्वर- हरकती दाखल

Published on

देवरूख विकास आराखड्यावर ८८ हरकती
प्रस्तावित आराखडा गैरसोयीचा ; तांत्रिक समिती नेमण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः देवरूख विकास आराखडा तयार झाला असून, हरकती मागवण्यात आल्या आहेत. या आराखड्याबाबत देवरूख येथील क्रांती व्यापारी संघटनेने एक सामुदायिक तर ८८ वैयक्तिक हरकती देवरूख नगरपंचायतीत दाखल केल्या आहेत.
केवळ सॅटेलाईट आधारित सर्व्हेसोबत प्रत्यक्ष सर्व्हे अपेक्षित होता तो झाला नाही. त्यामुळे अनेक रस्ते आणि आरक्षणे ही विनाउपयोगी आणि अन्यायकारक वाटत आहेत. बाजारपेठेमधील मुख्य रस्त्यासह इतर सहाय्यक रस्ते पुरेसे असताना अनावश्यक रुंदीकरण प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे ९० टक्के बाजारपेठ विस्थापित होण्याचा धोका आहे. लहान-मोठे शेकडो व्यापारी अडचणीत येऊन बेरोजगार होण्याची शक्यता आहे. अनेक प्रस्तावित रस्ते हे लोकांच्या घरादारावरून जात आहेत. त्यामुळे विकासाचे स्वप्न पाहणारे नागरिकच बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिथे रस्ता नाही तिथे पार्किंग सुविधा, एक बाजूला मटण-चिकन मार्केट जे नागरिकांना गैरसोयीचे आहे तसेच तेथील रहिवाशांना त्रासदायक आहे. मोगरवणे येथील क्रीडांगण अशा भागात आहे, जिथे मुलांना जाणे गैरसोयीचे ठरणार आहे. अशा ओस पडलेल्या ठिकाणी क्रीडांगण करून रहिवाशांना नको तो त्रास होऊ शकतो. त्यामुळे आराखड्यातील प्रस्तावित कामे गैरसोयीची ठरणारी आहेत.
यामुळे क्रांती व्यापारी संघटेनेतर्फे ८८ वैयक्तिक हरकती आणि एक सामुदायिक हरकतीचा अर्ज देण्यात आला आहे. नागरिकांना सोयीसाठी ७०० नमुना हरकत अर्ज मोफत वाटले आहेत. त्यामुळे नागरिक स्वतंत्रपणेही हरकती नोंदवू शकतात. या सर्व हरकती विचारात घेऊन पुन्हा प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करून तांत्रिक समिती नेमावी. त्यात प्रशासकीय, लोकप्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, नागरिकांनी सहभागी करून घ्यावे आणि नवा लोकोपयोगी विकास आराखडा तयार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-----
हरकती नोंदवण्याचे आवाहन
देवरूखमधील विविध सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे, देवस्थान मंडळे यांनी यामध्ये मागे न राहता आपल्या सामुदायिक हरकती नक्की नोंदवल्या पाहिजेत. देवरूख म्हणून आपण एक राहिले पाहिजे, असे आवाहन क्रांती व्यापारी संघटनेने केले आहे.
------

आराखड्यामध्ये हे अपेक्षित
* संतुलित वाहतूक नियोजन ः नियोयन करून बसथांबे द्यावेत, सार्वजनिक पार्किंग, ट्रॅफिक पोलिस यंत्रणा, सिग्नल यंत्रणा.
* दाट वस्तीसाठी विशेष धोरण ः दाट वस्तीभागांसाठी स्वतंत्र नियोजन झोन सरसकट रुंदीकरणाऐवजी समायोजन योजना
* आर्थिक विकास केंद्र ः कृषी उत्पादन प्रक्रिया पार्क, लघुउद्योग क्लस्टर
* स्टार्टअप् / व्यावसायिक संकुल ःक्षेत्र देवरूख फक्त बाजारपेठ नसून रिजनल ट्रेड हब बनू शकतो.
* पर्यावरणीय संतुलन नदी संरक्षण झोन ः पूररेषेचे वैज्ञानिक नकाशांकन, ग्रीन बेल्ट व सार्वजनिक बागा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
* सामाजिक पायाभूत सुविधा ः आधुनिक आरोग्य केंद्र, शैक्षणिक संकुले, क्रीडांगण, योग्य ठिकाणी मल्टीपर्पज कम्युनिटी हॉल.
* डिजिटल व स्मार्ट ग्रोथ ः अंडरग्राउंड केबलिंग सीसीटीव्ही व स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, जीआयएसआधारित नगररचना
--
कोट
विकास आराखडा हा ३० वर्षांचा विकास दृष्टिकोन असतो, तो वर्तमान मोडून नव्हे तर भविष्य घडवण्यासाठी असावा. क्रांती व्यापारी संघटनेने सुचवलेले बदल हे खूप विचार करून सुचवले आहेत, त्यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. विकास करत असताना ग्रामस्थांसह व्यापार यांच्या मताला महत्त्व दिले जावे.
-- निखिल कोळवणकर, व्यापारी, देवरूख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com