वन्यप्राण्यांचा त्रास, योजनांचा फास!
27591
वन्यप्राण्यांचा त्रास, योजनांचा फास!
किसान संघाचा मोर्चा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. वन्य प्राण्यांपासून होणारी नुकसानी, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसानी यांसह शासनाच्या विविध योजना राबविताना त्यामधील त्रुटी यामुळे शेतकरी त्रासल्याने संताप व्यक्त झाला. विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शासनाने योग्य तो न्याय द्यावा. यासाठी आज भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हा संघटन मंत्री अभय भिडे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, पुरस्कार प्राप्त शेतकरी लक्ष्मण वराडकर, प्रगतशील शेतकरी जयराम परब, मनोहर ठिकार, मिलिंद पंतवालालकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
ओरोस बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा निघालेल्या या मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी जोरजोरात घोषणा देत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष सावंत यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी शासकीय योजनांमध्ये असलेल्या त्रुटी तसेच वन्य प्राण्यांमुळे होणारा त्रास याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या वेळीच सोडवून त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून त्यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधले. ई-पीक पाहणी ॲपमध्ये असणाऱ्या तांत्रिक त्रुटी व त्याचे होत असलेले दुष्परिणाम यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी निवेदनात आहे.
-----------
इतर काही मागण्या अशा...
मनरेगातील प्रलंबित प्रकरणांना त्वरित मंजुरी द्यावी. भात खरेदी केंद्रावर तुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पावतीपेक्षा जास्त भात घेतले जात आहे, ते थांबवावे. भात खरेदी केंद्र १ डिसेंबरपूर्वी सुरू करावे व प्रति गुंठा भात खरेदी मर्यादा वाढवून मिळावी. सोलर पंप सक्तीचा न करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वन फेज व थ्री फेज जोडणी द्यावी. सोलार पंपाची सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी. शेतीला वन्य प्राण्यांचा होणारा उपद्रव थांबविण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

