मालवण येथे उद्या योजनांचे महाशिबिर
मालवण येथे उद्या
योजनांचे महाशिबिर
मालवण ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती, मालवण, जिल्हा मुलकी व पोलिस प्रशासन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचे महाशिबिर रविवारी (ता. १) सकाळी १०.३० वाजता रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, सिंधुदुर्ग श्याम चांडक यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून न्यायमूर्ती फरहान दुभाष यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (सिंधुदुर्ग) डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षा अॅड. परिमल नाईक उपस्थित राहणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष मोहम्मद फकीह यांनी केले आहे.
--------
जामसंडेत आज
विविध कार्यक्रम
देवगड ः जामसंडे येथील शहर व्यापारी संघटना व महिला व्यापारी संघटनेतर्फे उद्या (ता. २८) सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सायंकाळी अभंगवाणी कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ पासून हळदी-कुंकू, ३ ते ४.३० वामनराव पै प्रणित येथील जीवन विद्या ज्ञानसाधना केंद्राच्यावतीने शंकर बांदकर (बेळगाव) यांचा प्रबोधनपर कार्यक्रम, ४.३० ते ६ मल्लखांब व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक (सादरकर्ते- श्री देव रवळनाथ क्रीडा संघ, वायंगणी, ता. मालवण), सायंकाळी ६ ते ७.३० बुवा अजित गोसावी यांचा ‘अभंगवाणी’ कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता जामसंडे बाजारपेठेमधील ज्येष्ठ व्यापारी सन्मान, रात्री १० वाजता साई कलामंच कुडाळनिर्मित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रम होणार आहे.
--------------
कणकवलीत मार्चला
टेनिसबॉल क्रिकेट
कणकवली ः युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्गच्यावतीने २१ व २२ मार्चला कणकवली कॉलेजच्या पटांगणावर भव्य ‘संताजी जगनाडे चषक’ ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम विजेत्यास २०,०२६ रुपये व चषक, द्वितीय १०,०२६ रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकास ५,०२६ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर खेळाडूस सायकल व चषक, तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक यांना स्मार्टवॉच व चषक देण्यात येणार आहे. सर्व खेळाडू तेली समाजातील असणे आवश्यक आहेत. नावनोंदणीसाठी महेश डिचोलकर, विशाल नेरकर किंवा चेतन फोंडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
------
मालोंड प्रीमियर लीग
स्पर्धा आजपासून
मसुरे ः ओंकार क्रिकेट क्लब, मालोंड (ता. मालवण) यांच्यावतीने २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत मालोंड माळ येथे मालोंड प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे. प्रथम १०,००० व चषक, द्वितीय ७००० व चषक, तृतीय ५००० रुपये व चषक तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, खेळाडूंना सुवर्णपदक, शिस्तबद्ध संघ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ओंकार क्रिकेट क्लब, मालोंड यांनी केले आहे.
.....................
पियाळीत आज
कबड्डी स्पर्धा
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि कणकवली तालुका असोसिएशनच्या सहकार्याने स्वयंभू गांगेश्वर प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष गट) उद्या (ता. २८) आयोजित केली आहे. ही स्पर्धा पियाळी (तेलीवाडी), स्वयंभू मंदिर रोड येथील मैदानावर पार आहे. विजेत्यांना प्रथम ११,०२६ रुपये व चषक, द्वितीय ७,०२६ रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ प्रत्येकी २,०२६ रुपये व चषक याशिवाय अष्टपैलू खेळाडू (१०२६ रुपये), उत्कृष्ट चढाई (५२६ रुपये), उत्कृष्ट पकड (५२६ रुपये) अशी पारितोषिकेही आहेत. सुनील तेली यांच्याशी संपर्क साधावा.
---
साटेली कुळकार देव
वर्धापन दिन आज
आरोंदा ः साटेली कातवडवाडी येथील श्री देव कुळकार देवस्थान वर्धापन दिन उद्या (ता. २८) साजरा होणार आहे. यानिमित्त देवस्थानस्थळी सकाळी पूजा, अभिषेक, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कातवडवाडीवासीयांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

