सावंतवाडीकरांवर नव्या करांचा बोजा नाही

सावंतवाडीकरांवर नव्या करांचा बोजा नाही

Published on

27612

सावंतवाडीकरांवर नव्या करांचा बोजा नाही

अंदाजपत्रक सादर; ८० कोटींची भुयारी गटार योजना होणार


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः नागरिकांवर कोणत्याही नव्या कराचा बोजा न टाकणारा येथील पालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आज प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सादर  केले. त्यासोबतच २०२५-२६ या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रकही मांडण्यात आले. श्री. निरवडेकर  यांनी या अंदाजपत्रकातून विकासाला गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. एकूण १४९ कोटी ९९ लाख ७२ हजार ८७३ रुपयांची जमा तर ९३ कोटी ५० लाख १४ हजार रुपयांचा खर्च, अशी तरतूद केली आहे.
सभागृहात अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा झाली. विरोधी गटातील शिवसेना शिंदे गटाचे  नगरसेवक  संजू परब  यांनी विविध तरतुदींवर आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले. महसुली वाढीचे उद्दिष्ट, कर वसुली, भांडवली प्रकल्पांची अंमलबजावणी यावरून चांगलीच खडाजंगी रंगली. अर्थसंकल्पावरील  चर्चेत  प्रामुख्याने  नगरसेवक परब  यांनी  सहभाग  घेतला. २०२५-२६ सुधारित अंदाजपत्रकानुसार प्रारंभिक शिल्लक ९२ कोटी ५ लाख ६१ हजार ७७२ रुपये होती. २०२६-२७ साठी प्रारंभिक शिल्लक ७६ कोटी ६१ लाख २९ हजार ८७३ रुपये गृहित धरली आहे. महसुली जमा २०९ कोटी ९६ लाख २० हजार रुपये अपेक्षित असून भांडवली जमा ५२ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपये अशी तरतूद आहे. महसुली खर्च २५ कोटी ६९ लाख १४ हजार रुपये तर भांडवली खर्च ६७ कोटी ८१ लाख रुपये असा प्रस्ताव आहे. महसुली व भांडवली उत्पन्नाच्या तुलनेत खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येतो; मात्र महसुली उत्पन्न वाढीसाठी कठोर पावले उचलण्याची गरज प्रशासनाने मान्य केली आहे.

८० कोटींची भुयारी गटार योजना
शहरातील सांडपाणी व्यवस्थापन हा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे ८० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या भुयारी गटर व्यवस्थेचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याची घोषणा प्रभारी नगराध्यक्ष  निरवडेकर  यांनी केली. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथान महाभियानांतर्गत प्रस्ताव सादर केला जाणार असून २०२६-२७ साठी २० कोटींची तरतूद केली आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची तरतूदही अंदाजपत्रकात आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही योजना अत्यंत गरजेची असल्याचे निरवडेकर  यांनी  सांगितले. 

२४ तास पाणीपुरवठ्याचे लक्ष्य
सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करण्यासाठी १७.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाळणेकोंड धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढवून २४ तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच कुणकेरी पाळणेकोंड धरणातील गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक वाढणार आहे, असे निरवडेकर यांनी स्पष्ट केले. पाणीपट्टीची एकूण मागणी २.१० कोटी रुपये असून त्यापैकी १.७५ कोटींची वसुली अपेक्षित आहे; मात्र १०० टक्के वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

मोती तलाव सुशोभीकरण
शहराची अस्मिता असलेल्या मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधीची तरतूद आहे. तलाव परिसरात बोटिंग क्लब सुरू करून ५ लाखांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यासोबत जिमखाना मैदान, क्रीडा संकुलाचा दर्जावाढ, बहुउद्देशीय सभागृह उभारणी, उद्यान विकास यांसारख्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने शिल्पग्राम, हेल्थ पार्क, जलतरण तलाव, जिमखाना रेस्ट हाऊस यांमधून सुमारे ४२.५ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
...........................
मालमत्ता कर वसुलीवर भर
नगरपरिषदेने ३.२५ कोटींची मालमत्ता कर मागणी निश्चित केली आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमाच्या कलम ११४ नुसार मोकळ्या भूखंडांवरही कर आकारणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. घरपट्टीचा दर सध्या २६ टक्के असून भविष्यात भांडवली मूल्यावर कर आकारणी करण्याचा विचार आहे. केंद्राच्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार हा बदल आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. मालमत्ता कराची १०० टक्के वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे.
....................
रस्ते, खड्डे व अग्निसुरक्षा
शहरातील रस्त्यांची देखभाल व खड्डे बुजविण्यासाठी ५० लाखांची तरतूद आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी २५ लाख रुपये राखीव ठेवले आहेत. भटक्या कुत्र्यांवरील चर्चेत संजू परब, नगरसेवक देवा टेमकर, तौकीर शेख यांनी सहभाग दर्शवला. भटक्या  कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आणखी तरतूद करण्याची सूचना परब यांनी केली. हा प्रश्न गंभीर असल्याचे निरवडेकर यांनी  सांगितले. अग्निसुरक्षा निधीतून १.५० कोटी रुपये अपेक्षित असून अग्निशमन सेवेला बळकटी देण्याचे नियोजन आहे. भाजी मार्केट व मच्छी मार्केट शुल्कामधून ४३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शहरातील पथविक्रेत्यांची नोंदणी करून त्यांच्याकडून नियमानुसार शुल्क आकारण्याचा निर्णय आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागा, जिमखाना मैदान, शिव उद्यान, व्यापारी संकुलातील गाळे यांमधून भाडे वसुलीवर भर देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com