सैद्धांतिक ज्ञानासोबतच आता अनुभवही
27741
सैद्धांतिक ज्ञानासोबतच आता अनुभवही
सावंतवाडी, गडहिंग्लज महाविद्यालयात सामंजस्य करार
सावंतवाडी, ता. २८ : उच्च शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा देण्यासाठी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय (सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित) आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज (ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ संचालित) यांच्या अर्थशास्त्र व वाणिज्य विभागांदरम्यान सामंजस्य करार झाला.
महाविद्यालयातर्फे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. नीलम धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, हा करार केवळ औपचारिक न राहता ज्ञान विनिमय, संशोधन, कौशल्य विकास आणि शैक्षणिक सहकार्याचा मजबूत दुवा ठरेल. अर्थशास्त्र आणि वाणिज्य हे विषय परस्परपूरक असून अर्थव्यवस्थेच्या तत्त्वज्ञानाला व्यवहारातील गती देण्याचे कार्य वाणिज्य करते. या करारामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवाची प्रभावी संधी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. यावेळी डॉ. धुरी व सहाय्यक प्राध्यापक कांबळे यांनी मार्गदर्शन केले. ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी सहाय्यक प्राध्यापिका श्रद्धा बनसोडे, सहाय्यक प्राध्यापक गजानन कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापिका संतोषी कनगुटकर, सहाय्यक प्राध्यापक सचिन पाटील, प्रा. डॉ. संजीवनी पाटील, मुख्य लिपिक प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. सहाय्यक प्राध्यापिका पूजा कोचरी यांनी सूत्रसंचालन केले. आयक्यूएसी समन्वयक तथा वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. काशिनाथ तनंगे यांनी आभार मानले.
---
संशोधन उपक्रम राबविणे शक्य
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांचे आदानप्रदान, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रे व कार्यशाळांचे आयोजन, अभ्यास भेटी तसेच विविध संशोधन उपक्रम संयुक्तपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

