संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही

संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही

Published on

27753

संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही

विजय कुलकर्णी : कुडाळात गिरणी कामगार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ : ‘गिरणी कामगारांच्या लढ्याला वीस वर्षांचा इतिहास आहे. आपण संघटितपणे लढल्यामुळेच यश मिळत आहे. भविष्यातही हे यश मिळवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच १० मार्चला गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईत घरे देण्यास राज्य सरकारला भाग पाडण्यासाठी, आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा,’ असे आवाहन गिरणी कामगारांचे नेते कॉ. विजय कुलकर्णी यांनी मेळाव्यात केले.
सर्व श्रमिक संघटनांच्या वतीने गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, यासाठी तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी गिरणी कामगारांचा मेळावा येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या सभागृहात आज झाला. कॉ. अतुल दिघे, कॉ. बी. के. आंब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी गिरणी कामगार कोकण नेते कॉ. शांताराम परब, संतोष मोरे, सुनील निचम, संतोष चव्हाण, आनंद भोगण, दीपक परब आदी उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘सर्व श्रमिक संघटना वीस वर्षांपासून गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देत आहे. लालबावटा विचारावर ही संघटना वाटचाल करत असून, या संघटनेच्या यशासाठी नेहमीच सहकार्य करू. गिरणी कामगारांनी न्याय्य हक्कासाठी लढून ८२ मध्ये संप केला, तेव्हापासून सातत्याने हा लढा सुरू आहे. आमच्या गिरणी कामगारांना व त्यांच्या वारसदारांना मुंबईतच घरे दिली पाहिजेत, हे सरकारला भाग पाडण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनावर १० मार्चला सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर प्रचंड मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद सरकारला दाखवावी. मालकावर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर, ही आमची रास्त मागणी आहे. हा लढा लढतानाच शेतकरी व कामगारविरोधी जे कायदे आहेत, त्याविरुद्धही आमचा लढा असणार आहे.’ श्रमिक संघटनेचे नेते शांताराम परब यांनी प्रास्ताविक केले.
------
न्याय्य हक्कासाठीच आमचा लढा!
श्री. आंब्रे म्हणाले, ‘गेली २० वर्षे आपण देत असलेल्या संघर्षामुळे यश मिळत आहे. अनेक मोर्चे काढले, याबाबत सर्वांनाच त्रास होतो. मात्र, तो त्रास सहन केल्याशिवाय आपण यश मिळवू शकत नाही. राज्य शासनाचा शेलू-वांगणीला घरे देण्याचा जो डाव आहे, तो आपण १० मार्चच्या मोर्चाने हाणून पाडला पाहिजे. शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही. राज्यात सत्ता कोणाचीही येवो, आमचा लढा हा न्याय्य हक्कासाठीच असेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com