रत्नागिरी- सदर
तळपत्या सूर्याचे दैवीत्व....
(५ फेब्रुवारी पान ६ फोटोसह घ्या)
कोकणातील सुर्योपासनेची
परंपरा : आंबव पोंक्षे
कोकणामध्ये ग्रामदेवतांव्यतिरिक्त मुख्य प्रवाहातील देवतांचे अस्तित्वही अगदी प्राचीन काळापासून आढळते. प्राचीन काळात येथे शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य आणि सौर हे पंथ कोकणात अस्तित्वात होते. प्रत्येक संप्रदायाचे स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांची परंपरा कोकणात आजपर्यंत टिकून राहून विस्तारत गेली आहे.
कोकणामध्ये सौर संप्रदायाचे अस्तित्व किमान चौथ्या-पाचव्या शतकांपासून दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव आणि परुळे ही गावे याचे पुरावे देतात. पुढील काळात, म्हणजे मध्ययुगाच्या प्रारंभी तसेच मध्ययुगात, रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, खारेपाटन आणि थिबा पॅलेस संग्रहालय येथे आढळणाऱ्या सूर्यप्रतिमा या परंपरेचा दाखला देतात. देवगड तालुक्यातील जामसांडे गावातील दीर्बादेवी मंदिर परिसरामध्ये या परंपरेचे सातत्य दिसून येते.
- मिलनाथ पातेरे, लांजा
------
उत्तरमध्ययुगीन कालखंडात कोकणात मोठ्या प्रमाणात सौर परंपरेचा विकास झालेला दिसून येतो. या काळात सूर्याच्या मूर्ती आणि मंदिरे मोठ्या प्रमाणात उभारली गेली. याचकाळात स्वतंत्र पंथ म्हणून अस्तित्वात असताना सूर्याला पंचायतन पूजेमध्ये इतर देवतांसोबत स्थान मिळालेले दिसून येते. तसेच विष्णूच्या सूर्यनारायण रूपाला कोकणात मोठ्या प्रमाणात मान्यता प्राप्त झाली. विष्णूबरोबर सूर्य आणि त्याचे सूर्यनारायण रूप विशेषतः ब्राह्मण समाजात प्रचलित आणि मान्यताप्राप्त झालेले दिसून येते. उत्तर मध्यकाळात आंबव पोंक्षे, आरवली आणि नेवरे सारख्या गावांमध्ये सूर्य मुख्य देवता म्हणून पूजला जात राहिला, तर रामेश्वर (संगमेश्वर) आणि जंबूकेश्वर (रत्नागिरी) यांसारख्या प्रमुख मंदिरांमध्ये तो पंचायतन देवतेचा एक भाग बनला.
आज आंबव पोंक्षे (ता. संगमेश्वर) येथील सूर्यनारायण मंदिराचा आढावा घेत आहोत. आंबव पोंक्षे हे एक ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. संगमेश्वर तालुक्यापासून २०-२५ किमी वर वसलेले हे गाव. येथील ब्राह्मणवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला सुर्यनारायण मंदिर हे सौर सांप्रदायाचे एक स्थान कोकणातील सूर्योपासनेच्या अखंड परंपरेचे जिवंत उदाहरण आहे. गावात ग्रामदेवता वाघजाई तसेच मारुती यांची प्राचीन मंदिरेही आहेत.
आंबव गावामध्ये पोंक्षे घराण्याचे मूळ पुरुष इ.स. १६०० च्या दरम्यान आले असे सांगितले जाते. हे पोंक्षे घराण्याचे पूर्वज सुरुवातीला आंबव आणि आरवली गावांच्या मधे रस्त्याच्या पायवाटेजवळ असलेल्या एका तळीजवळ राहत होते. काही वर्षे तिथे वास्तव्य केल्यावर याच ठिकाणी सूर्यनारायण मंदिराची प्रथम स्थापना केली गेली असे सांगितले जाते. पुढे पोंक्षे परिवार साध्याच्या राहत्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे सध्या ज्या ठिकाणी मंदिर अस्तित्वात आहे त्याठिकाणी नवीन मंदिराची उभारणी झाली.
सुर्यनारायण मंदिराचा आणि मूर्ती स्थापनेचा इतिहास अत्यंत रोचक आहे. असे सांगण्यात येते की अठराव्या शतकाच्या सुरुवातीला येथे पहिली मूर्ती स्थापन करण्यात आली. त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सन १८२१ मध्ये मंदिरात नवीन मूर्ती आणण्यात आली, आणि मंदिरातील जुनी मूर्ती आरवली गाव आणि पोंक्षे गावाच्या मध्यात ठेवण्यात आली. पुढे ती आरवली गावातील ब्राह्मण वाडीत स्थापन करण्यात आली आणि नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना सूर्यनारायण मंदिरात नव्याने झाली. परंतु दुर्दैवाने, पुढील शतकाच्या अंतराने इ.स. १९३७ ही नवीन मूर्ती भग्न झाल्यामुळे मंदिर परिसरात त्याकाळी असलेल्या जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ विसर्जित करण्यात आली. त्यानंतर मुंबईतून बिहारीलाल सूरजमल या कारागिराला नवीन मूर्ती घडविण्यासाठी पाचारण घालण्यात आले. बिहारीलाल सूरजमल यांनी डिसेंबर १९३६ मध्ये एक मूर्ती बनवली परंतु ती प्रतिष्ठापनेसाठी योग्य स्थितीत नसल्या कारणाने त्याच शिल्पकाराने १-५-१९३७ रोजी आणखी एक नवीन मूर्ती पाठवून दिली आणि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ शु. १३ शके १८५९ म्हणजे सोमवार दिनांक २१ जून १९३७ मध्ये बनवलेल्या मूर्तीची स्थापना केली. नवीन मूर्ती सोबत नवीन मंदिर दिनांक २८-१-१९३७ मध्ये सिमेंट-चुन्याचा गाभारा घालण्यात आला, मंदिराला सागवानी लाकडाचे बांधकाम आणि घुमटीवर पत्रे सोबत इतर मंदिराला कौलारू छप्पर घालण्यात आले. ज्याला सभामंडपासोबत उत्तर आणि दक्षिणेला प्रत्येकी एक -एक ओसरी बांधली होती. पुढे १९६६ मध्ये मंदिराला लादी बसवली गेली यासाठी मुंबई हून राजस्थानी कारागीर आणले होते. त्यानंतर पुन्हा १९९३-९५ या काळात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करून नवे मंदिर उभे केले गेले. यासाठी बांधकाम विषयातील तज्ज्ञ जयंतराव परांजपे आणि स्थापत्य विशारद मुकुंदराव रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले गेले.
सन १९९३-९५ काळी सिमेंट काँक्रीटने बांधलेले मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी असून मंदिर पंचायतन पद्धतीनुसार गर्भगृहातील मुख्य देवतेसोबत इतर चार देवतांसाठी देवकोष्ठके तयार केली आहेत. गर्भगृहात मुख्य देवता म्हणून श्री सूर्यनारायण सात घोड्यांच्या रथामध्ये पद्मासनामध्ये विराजमान आहेत. मूर्तीची उंची व रुंदी अडीच फूट असून एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात चक्र धारण केलेले आहे. मूर्तीच्या पाठीमागे प्रभावळ असून त्यावर सूर्य किरणांचे प्रतीकात्मक चित्रण आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस चामरधारी असून त्या साडी-चोळी परिधान केलेल्या स्थानिक वेशभूषेत दिसतात. रथावर सारथी अरुण बसलेले असून सात घोडे ओढत असलेला रथ दाखवला आहे. गर्भगृहाच्या बाहेरील भिंतींवर पंचायतनातील इतर देवतांची स्थापना आहे ज्यामध्ये गणपती, शिव, विष्णू आणि देवी स्थानापन्न आहेत. मंदिराच्या समोरच्या आवारात पोंक्षे कुटुंबाचे मूळ पुरुष श्री विठोबा त्र्यंबक पोंक्षे यांच्या पादुका साक्षीत समाधी आहे. मंदिराची रोज पूजा-अर्चा केली जाते सोबत या पादुकांचेही पूजन दररोज केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

