रत्नागिरी- रत्नागिरी पालिकेला २ कोटी ९३ लाख घनकचरा मंजूर

रत्नागिरी- रत्नागिरी पालिकेला २ कोटी ९३ लाख घनकचरा मंजूर

Published on

रत्नागिरी पालिकेला घनकचरा प्रकल्प मंजूर

स्वच्छ महाराष्ट्र अभियान; २ कोटी ९३ लाखांचा निधी

रत्नागिरी, ता. २८ : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या साहाय्याने रत्नागिरी नगर पालिकेच्या कचरा व्यवस्थापनाला आता मोठी गती मिळणार आहे. रत्नागिरीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सुमारे २ कोटी ९३ लाख २३ हजार २७९ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यातून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यामुळे साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडचाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
या प्रकल्पाची आखणी केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान-२.०’च्या धर्तीवर करण्यात आली आहे. राज्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी २०२६ झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या २१ व्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन त्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. मंजूर आराखड्यानुसार, हा प्रकल्प तीन मुख्य भागांत विभागला गेला आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यासाठी १ कोटी ४९ लाख १२ हजार ५११ रुपये खर्च केले जातील. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७९ लाख ९३ हजार १३८ रुपये, तर शास्त्रोक्त पद्धतीने कचरा भूमी भरणा करण्यासाठी ६४ लाख १७ हजार ६३१ रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.
हा प्रकल्प राबविताना पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने काही कडक अटी घातल्या आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेला तत्काळ ई-निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीची आणि पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे अभिलेखात ठेवणे बंधनकारक आहे. आगामी काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीची आणि विहित मुदतीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
---------------
चौकट
पालिकेला भरावे लागणार २८ लाख ५६ हजार
मंजूर झालेल्या एकूण निधीमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा १ कोटी ४२ लाख ८० हजार ५०० रुपये असून, राज्य शासन १ कोटी १४ लाख २४ हजार ४०० रुपये देणार आहे. उर्वरित २८ लाख ५६ हजार १०० रुपये रत्नागिरी पालिकेला स्वतःच्या निधीतून उभे करावे लागणार आहेत. जर प्रकल्पाची किंमत मूळ अंदाजपत्रकापेक्षा वाढली, तर वाढीव खर्चाची संपूर्ण जबाबदारी पालिकेची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com