बोर्डवे रेल्वे स्टेशनला मंजुरी द्या!
27813
बोर्डवे रेल्वे स्टेशनला मंजुरी द्या!
‘ओसरगाव दशक्रोशी’ ः रेलरोको आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ : बोर्डवे येथे स्वतंत्र रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी ओसरगाव दशक्रोशी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारपासून बोर्डवे रेल्वे फाटक येथे उपोषण सुरू केले आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र रेलरोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून नागरिकांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.
रेल्वे अधिकाऱ्यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकल्पासाठी अंदाजे ३० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले. संबंधित विभागाकडे याबाबत आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, उपोषणादरम्यान बबली राणे यांनी उपस्थितांना येथील महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली. आंदोलनस्थळी विलास परब, जगन्नाथ राणे, प्रमोद कावले, महादेव राठवड, मोहन येनडे आदींनी भेट देत आंदोलनास पाठिंबा दर्शविला. तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राजेश सुरावडे, दुर्गेश यादव, युवराज पाटील, होमगार्ड प्रशांत गोसावी व होमगार्ड मंदार सुर्वे हे देखील उपस्थित होते.
---
पाठपुरावा करू ः नगराध्यक्ष
नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, की ‘‘बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजुरीसाठी आवश्यक सर्वतोपरी मदत केली जाईल. जिल्ह्यातील मंत्री, खासदार तसेच राज्य सरकारमधील जबाबदार मंत्र्यांकडे आणि रेल्वे मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

