कर्तव्यनिष्ठा व देवभक्तीचा अनोखा संगम : ‘संहिता’चा थरार
rat1p23.jpg-
27896
रत्नागिरी ः नाट्यसंघ अंबापेठ क्लब-अमरावती या संस्थेने केलेल्या वारकरी या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
राज्य नाट्य स्पर्धा - लोगो
कर्तव्यनिष्ठा व देवभक्तीचा अनोखा संगम : ‘संहिता’चा थरार
अंबापेठ क्लबचे सादरीकरण ; प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या संघर्षाची गाथा
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : ‘‘कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, देवभक्ती आणि देशसेवा या गोष्टी परस्परविरोधी नसून, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे,’’ असा संदेश देणारे ‘संहिता’ हे नाटक लेखक-दिग्दर्शक डॉ. चंद्रकांत शिंदे यांनी सादर केले. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत ‘नाट्यसंघ अंबापेठ क्लब, अमरावती’ या संस्थेने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर केला. निःस्वार्थ भावनेने आणि सचोटीने केलेले कर्तव्य हेच खरे पूजन आहे, असा मौलिक संदेश या नाटकातून देण्यात आला. कलाकारांचा कसदार अभिनय आणि आशयघन मांडणीला उपस्थित रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
काय आहे नाटक ?
‘वारकरी’ हे नाटक राणोजी शिंदे या एका प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. नाटकाची कथा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर घडते, जेव्हा गावातील वारकरी पंढरपूरच्या वारीला जाण्याची जय्यत तयारी करत असतात. राणोजी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतो; मात्र या गडबडीत त्याचे कुटुंबाकडे पूर्णतः दुर्लक्ष होते. त्याची पत्नी रुक्मिणी (रुख्मा) वारीला जाण्याची ओढ व्यक्त करते, पण कर्तव्याच्या दबावामुळे राणोजी तिला परवानगी देऊ शकत नाही, ज्यातून त्यांच्या संसारात तणाव निर्माण होतो.
कथानकात वळण तेव्हा येते, जेव्हा वारीत एक ट्रक घुसून काही वारकरी जखमी होतात. या अपघाताचा तपास करत असताना राणोजीवर राजकीय दबाव आणला जातो, जेणेकरून ट्रकचालकावर कारवाई होऊ नये. मात्र, आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता राणोजी तपास सुरूच ठेवतो. या घटनेमुळे दादा महाराज उपोषणाला बसतात आणि गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक आघाड्यांवर एकाकी पडलेला राणोजी हतबल होतो. एका प्रसंगात तो रागाच्या भरात घरातील विठ्ठलाची मूर्ती फोडण्याचा प्रयत्न करतो, परंतु रुक्मिणी त्याला वेळीच थांबवते.
त्याच वेळी कौटुंबिक वादही उफाळून येतात. राणोजीची बहीण वसुधा वाड्याच्या वाटणीचा जुना मुद्दा उपस्थित करते. राजकीय षडयंत्रामुळे राणोजीचे निलंबन होते, तरीही तो हार मानत नाही. अखेर, सत्याचा विजय होतो; ट्रकचालक पकडला जातो आणि अपघातामागील राजकीय हस्तक्षेपाचा पर्दाफाश होतो. राणोजीवरील सर्व आरोप मिटतात आणि त्याचे निलंबन मागे घेतले जाते. नाटकाच्या शेवटी, विठ्ठलपूजेचा बहुमान राणोजी आणि रुक्मिणी यांना मिळतो. "प्रामाणिक कर्तव्य हीच खरी भक्ती" असा सकारात्मक संदेश देत नाटकाचा शेवट होतो.
----------------------------
सूत्रधार आणि साहाय
निर्माता, नेपथ्य ः अॅड. प्रशांत देशपांडे, प्रकाश योजना ः गायत्री गुडधे, संगीत संयोजन ः डॉ. अवंतिका मानकर, ओम कराळे, श्रवण बोरबळ, सिद्धेश जोशी, पियुष हेलगारे व आराध्य गायकवाड. पार्श्वसंगीत ः प्रथमेश पुर्भे, रंगभूषा ः प्रतिक्षा गुडधे, वेशभूषा- अॅड. श्रद्धा पाटेकर, सुत्रसंचालन ः प्रा. डॉ. दिनेश खेडकर, डॉ. मनिष गायकवाड, प्रा. सुकृत चौधरी
--------------------
पात्र परिचय
राणोजी शिंदे ः डॉ. चंद्रकांत शिंदे, रखुमाई ः रिया गिते, मावशी ः रुचिता खेडकर, खेडतोड ः कौशल खंडेतोड, माहोरे ः समृद्धी माहोरे, वसुधा ः निर्मीती गणवीर, कल्याणी ः अनुश्री शेटे, दादा महाराज ः डॉ. मनिष गायकवाड, किर्ती ः किर्ती बहादुरे, नाना महाराज ः डॉ. दिनेश खेडकर, माधव ः सौम्य गोलाईतकर, केशव ः हर्षल मानेकर, गोविंद ः दिव्यांशू जोगे, वनाबाई ः डॉ. रेखा मग्गीरवार, तेजस्वीताई ः तेजल काळगेघ, सेक्रेटरी ः मोहित भिरडे, गौरी ः गौरी देवढे, प्रतिक्षा ः प्रतिक्षा वडनेरकर. वारकरी ः श्रावणी सोनटटक्के, राधिका पाखरे, ऋतुजा गेश्राम, वैष्णवी बनसोड, यशस्वी ढवळ, प्रतिक यावले, प्रा. सुकृत चौधरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

