बिग स्टोरी ः गुहागर, लाडघरचा झेंडा जगात फडकणार
rat१p१४.jpg-
27874
लाडघर किनाऱ्यावरील सुर्यास्त.
rat१p१५.jpg
27875
पर्यटन हंगामात होणारी गुहागर किनाऱ्यावरील गर्दी.
rat१p१६.jpg
27876
उंट सफरीतून रोजगार.
rat१p१७.jpg
27877
प्रचारासाठी गुहागर किनारी काढलेले वाळूशिल्प.
rat१p२२.jpg
27895
गुहागर : ब्ल्यु फ्लॅग च्या प्रचारासाठी समुद्रकिनाऱ्यावर बीच मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
इंट्रो
महाराष्ट्र सरकारने कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांचे प्रस्ताव ब्ल्यु फ्लॅग दर्जा मिळण्यासाठी डेन्मार्कच्या संस्थेकडे पाठवले. त्यानंतर विविध माध्यमातून या पाच समुद्रकिनाऱ्यावर चाललेल्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली. सामान्य जनतेपर्यंत हा विषय गेल्यानंतर अजून जीवरक्षक तैनात केले नाहीत. रस्ताच नाही, कचरा भरपूर आहे. मग कसला हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा असे प्रश्न विचारले जाऊ लागले. काहींनी प्रशासनावर तोंडसुख घेणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पसरवले. काहीजणांकडून आम्हाला असा विकासच नको, असा निराशावादी विचार पसरवला गेला; परंतु कोकणातील ५ समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे ब्ल्यु फ्लॅग मानांकन आहे तरी काय, त्याचे निकष काय असतात, त्याचा स्थानिकांना फायदा कसा होणार याबाबत अजूनही असलेली अनभिज्ञता दूर होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे....!
- मयुरेश पाटणकर, गुहागर
-------
गुहागर, लाडघरचा झेंडा जगात फडकणार
ब्ल्यु फ्लॅग दर्जा हा विकासाचा मार्ग ; आधी स्वच्छता मग समृद्धी
ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा म्हणजे काय ?
ज्या समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते, प्लास्टिक कचरा समुद्रावर पडणारच नाही याची काळजी घेतली जाते, कायम २४ बाय ७ जो किनारा स्वच्छ असतो, तेथील समुद्राचे पाणी देखील प्रदुषणमुक्त असते तसेच ज्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक तैनात आहेत, आंतरराष्ट्रीय किनारा सुरक्षेचे सर्व नियमांचे काटेकोरपणे केले जाते अशा पर्यावरणपूरक व पर्यटकांसाठी सुरक्षित समुद्रकिनाऱ्याचे वेळोवेळी परिक्षण केल्यानंतर डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ब्ल्यु फ्लॅग हे प्रमाणपत्र समुद्रकिनाऱ्याला देण्यात येते.
----
ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनाऱ्याचा स्थानिकांना फायदा काय?
एका अर्थाने या किनाऱ्याला मिळालेला हा आंतराराष्ट्रीय दर्जाचा सन्मान आहे. समुद्रकिनारा सुरक्षित झाल्याने पर्यटनामध्ये मोठी वाढ होते. देशी-परदेशी पर्यटक या समुद्रावर येत असल्याने पर्यटकांसाठी आवश्यक भौतिक सुविधा देणाऱ्या व्यवसायांमध्ये (केवळ हॉटेल आणि लॉजिंग नव्हेतर प्रवासी वहातूक, बाजारपेठ आदी) वाढ होते. स्वाभाविकपणे रोजगाराची निर्मिती होते. गावातील पायाभूत सुविधांचा विकास होतो. नागरिकांचे जीवनमान उंचावते.
पर्यावरणपूरक समुद्रकिनारा म्हणजे कचराविरहित स्वच्छ समुद्रकिनारा एवढेच अपेक्षित नाही. येथील समुद्रजल प्रदुषणमुक्त रहाण्यासाठी त्याची सातत्याने तपासणी होते. प्रदुषणमुक्त जलामुळे समुद्राती संपत्ती म्हणजे मासे ज्यावर मच्छीमार समाजाचा उदरनिर्वाह होतो त्यांची संख्या वाढेल तसेच विविध प्रजातीचे माशांचे या समुद्रात मिळू लागतील. समुद्रकिनाऱ्यावरील नष्ट होणाऱ्या वेलवर्गीय वनस्पतींचे संरक्षण केले जाईल. त्याचा फायदा समुद्रकिनाऱ्याची धूप थांबण्यास होईल. त्यामुळे किनाऱ्याचे संरक्षण होईल. ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाला गती मिळेल. तसेच किनाऱ्यावरील जैवविविधतेचे (छोटे खेकडे, शंख शिंपल्यातील प्राणी, निळ्या प्रकाशाने उजळणाऱ्या लाटांचे कारण बनणारे सुक्ष्म शेवाळ आदीचे ) संरक्षण व संवर्धन होईल.
----
ब्ल्यु फ्लॅग नामांकनासाठी कोणते निकष ?
ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा हे आंतरराष्ट्रीय इको लेबल असल्याने अंतिम प्रमाणपत्रासाठी ४ मुख्य गटात विभागलेले ३३ कठोर निकष पूर्ण करावे लागतात. यामध्ये समुद्रजलाची गुणवत्ता, किनाऱ्यावरील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन, यासाठी जनजागृती, स्वच्छता, कचरा संकलन, समुद्रकिनाऱ्याचा नकाशा, सुरक्षित क्षेत्र निश्चित करणे, किनारा ध्वजांकित करणे, माहिती फलक लावणे, समुद्रातील प्रदुषण थांबवणे, प्रशिक्षित जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यावर ठेवणे, बचाव उपकरणे , प्रथमोचार व रुग्णवाहिका सुविधा, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी, स्नानगृह, कपणे बदलण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, वाहनतळ अशा निकषांचा समावेश आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा ही मान्यता कायमस्वरूपी नसते. दरवर्षी या ३३ निकषांवर आधारित मुल्यांकन केले जाते. त्याची तपासणी प्रथम केंद्रातील अधिकाऱ्यांकडून केली जाते. त्याचा अहवाल डेन्मार्कच्या एफइइ संस्थेकडे पाठवला जातो. त्यानंतर संस्थेद्वारे नियुक्त केलेले अन्य देशातील अधिकारी समुद्रकिनाऱ्याचे परीक्षण करतात. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर एफइइ संस्था हे प्रमाणपत्र देते. अशी प्रक्रिया दरवर्षी घडते.
-------
महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेले समुद्रकिनारे
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर (ता. दापोली), रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, नागांव (ता. अलिबाग) आणि पालघर जिल्ह्यातील पर्णका (डहाणू) येथील समुद्रकिनारे राज्य सरकारने प्रस्तावित केले आहेत. या किनाऱ्यांवर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रत्येक समुद्रकिनाऱ्याला ४ कोटी याप्रमाणे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा उपयोग समुद्रकिनाऱ्यांवर मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. यात सार्वजनिक शौचालये, पिण्याचे स्वच्छ पाणी, पार्किंग सुविधा, कपडे बदलण्याच्या खोल्या, तात्पुरती दुकाने, कचराकुंडी, जीवरक्षक टॉवर, सौरदिवे, दिशादर्शक मंडळे, पथदिवे, प्रवेश रस्ते, सुरक्षा रक्षक तसेच कचरा व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
--------
नामांकन ते पायलट स्टेज दर्जा प्रवास
मे २०२५ मध्ये कोकणातील सात समुद्रकिनाऱ्यांची निवड ब्ल्यु फ्लॅग नामांकनासाठी करण्यात आली होती. लगेचच या कामाला सुरवात झाली. पहिला टप्पा होता तो या सातही समुद्रकिनाऱ्यांवर कार्यक्रम, उपक्रम, पायाभूत सुविधांच्या विकासाला सुरवात करण्याचा. त्यानंतर नामांकनसाठी या समुदकिनाऱ्याची निवड होणार की नाही हे डेन्मार्कची संस्था ठरवणार होती. कोकणातील सात समुद्रकिनाऱ्यांवर जनजागृती, कचरा व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता तपासणी, पर्यावरण, सुरक्षा अशा वेगवेगळ्या स्तरावरील कामांना सुरवात झाली. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जल, वायू मंत्रालयातर्फे या कामांचे, माहितीचे प्रत्यक्ष समुद्रकिनाऱ्यांवर परीक्षण झाले. त्याचे अहवाल डेन्मार्कमधील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संस्थेकडे पोचले. त्यातून कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर तसेच पालघर जिल्ह्यातील पर्णका या पाच किनाऱ्यांचा समावेश पायलट स्टेज मध्ये केला आहे.
---------
मानांकनाच्या दिशेने वाटचाल
आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्यानंतर त्या समुद्रकिनाऱ्याच्या परिसरातील पर्यटन व्यवसायात सुमारे २० ते २५ टक्के ने वाढ होते. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वनिधी इतका वाढतो की, सुरवातीला सरकारच्या मदतीने सुरू झालेल्या सेवांचा खर्च ती संस्था स्वत:च्या उत्पन्नातून करु शकते. ही गोष्ट भारतातील ब्ल्यु फ्लॅग दर्जा मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यांवर घडत आहे. हे सत्य अधिकाऱ्यांना समजावे म्हणून अभ्यास दौरा करण्यात आला. या दौऱ्यानंतर या प्रकल्पाकडे पाहण्याची अधिकाऱ्यांची दृष्टीच बदलली.
समुद्रकिनाऱ्यांवर वाळु शिल्पासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. किनाऱ्याची स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती, पर्यटन व्यावसायिकांच्या सभा घेणे असे उपक्रम राबवले जाऊ लागले. शासनाकडून ब्ल्यु फ्लॅगसाठी आवश्यक पायाभुत सुविधांच्या निर्मितीसाठी निधी दिला गेला आहे. आत्पकालिन स्थितीत उपयोगी पडतील अशा साधनांची खरेदी, जीवरक्षकांना प्रशिक्षण, समुद्रकिनाऱ्यावर माहिती फलक अशी कामे झाली आहेत. वाहनतळ, किनाऱ्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे रूंदीकरण किंवा नव्याने निर्मिती अशी कामे पटलावर आहेत. मानांकनामधील सर्व ३३ मुद्द्यांचा परिपुर्णतेकडे वाटचाल गतीने सुरू झाली आहे. या कामांचे पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून परीक्षण होईल. त्यानंतर एफइइकडून पहाणी झाल्यावर प्रत्यक्ष ब्ल्यु फ्लॅग समुद्रकिनारा हा दर्जा या समुद्रकिनाऱ्यांना मिळेल.
----------
सकारात्मक परिणाम समोर
ब्ल्यु फ्लॅग पायलट स्टेजनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता विषयाला गती मिळाली. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून किनारा स्वच्छतामोहिमा राबवण्यात येत आहेत. परिणामी, समुद्रावरील प्लास्टिक कचरा संकलनाचे प्रमाण सातत्याने होणाऱ्या स्वच्छतेमुळे कमी होऊ लागला आहे. लाडघरमध्ये प्लास्टिक बाटल्याना समुद्रावर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना सूचना देण्याचे काम समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आलेत. त्यामुळे समुद्रावरील अपघातांची संख्या घटली आहे. प्रत्यक्ष किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधतेचे संवर्धन होत आहे.
लाडघरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ
ब्ल्यु फ्लॅगच्या पायलट स्टेजला मंजूरी मिळाल्यानंतर लाडघरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छतेसाठी जनजागृती करणे, किनारा स्वच्छ ठेवणे हे येथील आव्हान होते. येथील ग्रामपंचायतीने पहिली पायरी म्हणून समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांच्या पिशव्यांना बंदी घातली. रात्री १० नंतर पार्सल फुडची सेवा बंद करण्याची विनंती हॉटेल व्यावसायिकांना केली. समुद्रकिनाऱ्यावर मद्यप्राशनाला बंदी असते त्याची काटकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. या निर्णयांमुळे किनाऱ्यावर कचराच होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात ३ विदेशी पर्यटक लाडघरमध्ये प्रथमच राहून गेले. सध्या लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित क्षेत्र निर्माण करणे, किनाऱ्यापर्यंत पोचणारे रस्ते, किनाऱ्याचा विकास आराखडा बनवणे, पर्यटनवाढीसाठी किनाऱ्यावर पायाभूत सुविधांची निर्मिती अशी कामे सुरू आहेत.
--------
गुहागरमध्ये शासनांतर्गत समन्वयाचा अभाव
गुहागरमधील ब्ल्यु फ्लॅग मानांकनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन महामंडळाची नेमणूक केली आहे. पर्यटन महामंडळाद्वारे समुद्रकिनारा आणि सुरूबनातील जमिनीची मोजणी करण्याची हालचाल सुरू आहे; मात्र या जमिनीची मालकी असलेले बंदर, पतन आणि वनविभागाचे अधिकारी मोजणीसाठी पुढेच येत नाहीत. भूमिअभिलेखकडून जमीनमोजणीबाबत अनास्था आहे. सुरूबनामधील जुन्या झाडांचे व कांदळवनाचे सर्वेक्षण करण्याचे काम वनविभागाने केलेले नाही. महसुल स्वत:च्या ताब्यात असलेल्या पोलिस परेड मैदानावरील हक्क सोडण्यास तयार नाही. समुद्रकिनाऱ्यालगत वाहनतळ, समुद्रकिनाऱ्यावर पोचण्यासाठीचे रस्ते बनवणे यासाठी भूसंपादन करायला लागणार आहे. त्यासाठी पुरेसा निधी पर्यटन महामंडळाकडे नाही. शासनाच्याच विभागांमध्ये समन्वय नसल्याने येथील कामे गतीने पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाहीत.
महाराष्ट्र शासनाला गुहागरचा समुद्रकिनारा खरोखरच ब्ल्यु फ्लॅग मानांकित बनवायचा असेल तर गुहागर नगरपंचायत, एमसीझेडएमए, पर्यटन महामंडळ, महसुल, वनविभाग, पतन विभाग, भूमिअभिलेख आणि बंदरखात्यांमधील अधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली पाहिजे. तातडीच्या निर्णयांसाठी स्वतंत्र प्रणाली तयार झाली पाहिजे. त्यावर जिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्याकडून मॉनिटरिंग झाले तरच ही सर्व कामे पूर्ण होतील.
------------
चौकट
नामांकन मंजूर, मानांकनाकडे वाटचाल
ब्ल्यु फ्लॅग बीच पायलट स्टेज याचा अर्थ अनेकांनी असा घेतला की, या समुद्रकिनाऱ्यांना ब्लु फ्लॅगचा दर्जाच मिळाला. त्यातूनच मग या किनाऱ्यांच्या स्थितीवर भाष्य करत नकारात्मकता पसरविण्याचा उद्योग अनेकांनी (अज्ञानातून) केला. काही मंडळींनी तर ब्ल्यु फ्लॅग दर्जालाच सुमार ठरवण्यापर्यंत मजल गाठली. वास्तविक या टप्प्याचा अर्थ या समुद्रकिनाऱ्यांवर ब्ल्यु फ्लॅग दर्जासाठी आवश्यक कामाला वेगाने सुरवात झाली आहे.
------------------------
चौकट
गुहागरातील स्वच्छ पेयजल केवळ चर्चेत
गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा हा फिल्ट्रेशन प्रकल्प नसल्याने अशुध्द, गढुळ स्वरूपाचा असतो. पावसाळ्यातील चार महिने तर नगरपंचायतीकडून आलेले पाणी घरात फिल्टर केले तरी गढुळ दिसते. ही गुहागर शहरातील सर्वात मोठी समस्या आहे. गुहागर नगरपंचायतीने नवीन पाणीयोजना, फिल्ट्रेशन प्लांटचा प्रस्ताव शासनाकडे १० वर्षांपूर्वी पाठवला आहे; मात्र त्याला आजपर्यंत परवानगी मिळालेली नाही.
---------------------------
चौकट
पर्यावरण संवर्धन हे आव्हानच
गुहागर आणि लाडघर या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांच्या मध्ये दाभोळ खाडी समुद्राला मिळते. लोटे औद्योगिक क्षेत्रात प्रदुषित पाण्यामुळे दाभोळ खाडीमधील जलप्रदूषण रोखणे ब्ल्यु फ्लॅगसाठी आव्हानात्मक आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील सॉलिड जेटी पतन विभागाने तोडली असली तरी आजही या जेटीचे अवशेष (मोठे दगड व तुटलेले बांधकाम) समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात बाधा निर्माण करत आहेत. स्थानिकांकडून होणारे अवैध वाळू उत्खनन हे किनाऱ्याच्या संवर्धनासाठी धोकादायक आहे.
---------------------------
कोट १
27937
गेल्या तीन महिन्यात लाडघरमधील पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील तरुणवर्ग उच्चशिक्षणानंतर पुन्हा पर्यटन व्यवसायासाठी गावात येत आहे. स्थलांतर कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा बनवण्यासाठी शासन, ग्रामपंचायत, पर्यटन व्यावसायिक, ग्रामस्थ एकत्र येऊन काम करत आहेत.
- दीपक विचारे, लाडघर हॉटेल व्यावसायिक
--------
कोट २
27935
ब्ल्यु फ्लॅग मानांकनामुळे गुहागरमधील पर्यटकांची संख्या वाढेल हे निश्चित. गुहागर शहरात लॉजिंगची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी इमारती नियमात बांधायच्या तर सीआझेडसंदर्भातील परवानग्यांसाठी १० लाखाहून अधिक होतो. हे पैसे कर्जरूपाने मिळत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना परवानगी मिळवण्यासाठी एवढा खर्च करणे सहजशक्य नाही. त्यामुळे बांधकाम परवानगीची रक्कम व प्रक्रिया सहज सोपी करणे आवश्यक आहे.
- अद्वैत जोशी, पर्यटन व्यावसायिक गुहागर
---------
कोट ३
27936
आज उद्योग नसल्याने आपल्याकडील तरुणाचे शहरांकडे स्थलांतर होत आहे. ब्ल्यु फ्लॅगमुळे गुहागरातील पर्यटन वाढेल. परिणामी, सेवाउद्योगांमध्ये वाढ होईल. रोजगारात सुमारे ४० टक्के वाढ होईल. गुहागरमधील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल. येथील लोककला, खाद्यसंस्कृती जगभरात पोचेल. शहराचा सर्वांगीण विकास म्हणून आम्ही या मानांकडे पाहात आहोत.
- उमेश भोसले, गटनेता, भाजप, गुहागर नगरपरीषद
---------
कोट ४
27934
गुहागर हे खूप सुंदर आहे. ६.४५ किमी चा विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेल गाव. धार्मिक सांस्कृतिक वारसा लाभलेले कला जिवंत ठेवणारी प्रेमळ माणसे. पर्यटन वाढीला सर्व गोष्टी अनुकूल असताना आता आलेल्या मोठ्या संधीचा लाभ घेत सध्याचे पर्यटन आणि उलाढाल ५ पटीने वाढविण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. त्यादृष्टीने नगर पंचायत प्रशासन आणि नवनिर्वाचित सर्व सदस्य या साठी आग्रही आहेत ही गुहागरच्या दृष्टीने आशावादी गोष्ट आहे. भविष्यात नक्की गुहागर कोकणची प्राचीन समृद्धता आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा समन्वय दाखवणार गाव असेल यात शंका नाही.
- स्वप्नील चव्हाण, मुख्याधिकारी गुहागर नगरपंचायत
rat१p२६.jpg-
27933
संतोष सांगळे
कोट ५
समुद्र पर्यटनासाठी येणारा पर्यटक इथे राहण्यासाठी आपल्याला पूर्वेकडील डोंगरात सनसेट पॉईंट, अष्टवणे गणपती मंदिर, परटवणे यासारखे नवे स्पॉट विकसीत करावे लागतील. तिथपर्यंत जाण्यासाठी उत्तम, रुंद रस्ते करावे लागतील. आंतरराष्ट्रीय पर्यटन दर्जामुळे शहरात गुणवत्तापूर्ण नागरी सुविधांमध्ये वाढ होईल. त्याचा फायदा शहरवासीयांना होईल.
- संतोष सांगळे, पर्यटन व्यावसायिक
चौकट
* दरवर्षी साधारण किती पर्यटक येतात
- गुहागर किनारी १ लाख ६५ हजार
* किनाऱ्यावरील पर्यटन व्यवसाय
- गुहागर शहर : १८०
- गुहागर तालुक्यात : ८००
* गुहागर किनारा ः वॉटर स्पोटर्स (जेटस्की, बनाना, स्लीपर, सोफा, कयाक, डिस्को, ड्रॅगन, मिकी माऊस), सॅण्ड बाईक, घोडा व उंट सवारी
* दरवर्षी सर्वसाधारण आर्थिक उलाढाल
- गुहागर : १४ कोटीहून अधिक
------
दृष्टिक्षेपात...
* किनाऱ्यांवर स्वच्छतामोहिमांची संख्या वाढली.
* प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होत आहे
* किनाऱ्यांवर वाळूशिल्प, बीच मॅरेथॉनसारखे उपक्रम
* पर्यटकांच्या माहितीसाठी ठिकठिकाणी फलक
- प्रशासन काय करतयं ?
* वाहनतळासाठी जागांचा शोध
* किनाऱ्याचा विकास आराखडा बनवणे
* समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची संख्या वाढवणे
* आपत्कालीन यंत्रणा सक्षम करणे
* सातत्याने समुद्रजलाचे परिक्षण
* समुद्रात पोहण्यासाठी सुरक्षित क्षेत्रनिर्मिती
* जीवरक्षकांना प्रशिक्षण आणि नियुक्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

