गिरणी कामगारांच्या घरांसाठी ‘निर्धार’
27924
गिरणी कामगारांच्या घरांसाठी ‘निर्धार’
बजरंग चव्हाण ः मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळावे, म्हणून १६ संघटना एकत्र आल्या आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते नेतृत्व करत आहेत. घरासाठी १ लाख ७० हजार गिरणी कामगार व वारसांनी अर्ज केले आहेत. पैकी सध्या १ लाख २५ हजार अर्ज छाननी होऊन पात्र होतील. त्यांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्यासाठी १० मार्चला राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १६ संघटनेचा विधिमंडळ अधिवेशनात निर्धार मोर्चा काढला जाणार आहे. त्याला शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वारसांची सभा येथील श्रीराम वाचन मंदिरमध्ये आयोजित केली होती. त्यावेळी श्री. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, कार्यालय सचिव सूर्यकांत बांदलकर, सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे उपस्थित होते. यावेळी गिरणी कामगारांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘गिरणी कामगारांना शेलू व वांगणीमध्ये घरे नको तर मुंबईत घरे हवीत, यासाठी लढा उभारला असून त्याला यश आले आहे. मुंबईमध्ये घरे मिळावी म्हणून १६ संघटनांचा संयुक्त लढा सुरू आहे. १ ऑक्टोबर १९८१ च्या पुढील संपात सहभागी झालेल्या कामगारांना घर मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. गिरणी कामगार व वारसांची एकजूट दाखवून निर्धार मोर्चात कामगार, वारस आणि कुटुंबातील सदस्यांनी सामील व्हावे.’’
यावेळी गिरणी कामगार व वारस सुरेखा भिसे, लॉरेन्स डिसोझा, सुमन मुळीक, सतीश निकम, रामचंद्र कोठावळे, महादेव सावंत यांनी विचार मांडले. प्रास्ताविक आणि आभार अभिमन्यू लोंढे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सुभाष परब, लॉरेन्स डिसोझा, विश्वनाथ कुबल, रामचंद्र कोठावळे आदींनी केले. यावेळी गणपत गावडे, सोनू दळवी, सुभाष नाईक, गोविंद पालव, रेखा लोंढे मुकुंद बाईत, जयवंती सावंत, गुरुनाथ राऊळयांच्यासह सुमारे १५० गिरणी कामगार व वारस उपस्थित होते.
---
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मोठा वाटा!
श्री. देसाई म्हणाले, ‘‘संयुक्त महाराष्ट्र लढा उभारला त्यात गिरणी कामगारांचा मोठा वाटा होता. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गिरणी कामगारांच्या घराचा पाया घातला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच गिरणी कामगारांना न्याय मिळाला आहे. १२५ गिरणींचे राष्ट्रीयकरण झाले. त्यामुळे मुंबईत रोजगार निर्माण झाला आणि मुंबई आर्थिक राजधानी बनली, हे विसरून चालणार नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

