संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हेच काँग्रेसचे ध्येय

संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हेच काँग्रेसचे ध्येय

Published on

rat1p25.jpg-
27932
चिपळूणः येथे काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ.

संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हेच काँग्रेसचे ध्येय
हर्षवर्धन सपकाळः मूठभर लोकांच्या हाती देश ठेवण्याचा भाजपचा उद्देश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : ‘‘देशात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा काँग्रेसची आहे, तर दुसरी भाजपची. काँग्रेस व भाजपच्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे; तर हा देश फक्त मूठभर लोकांचा असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि स्पृश्य-अस्पृश्यता मानणारा मनुवादी विचार भाजपचा आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चिपळूण येथे केली.
चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दोन विचारधारांमधील फरक स्पष्ट करून सांगितला. ते म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्ता आणि संपत्ती हवी आहे. सर्व यंत्रणांवर त्यांना कब्जा हवा असून हिंसा, द्वेष, भय पसरवणे व असत्य कथन करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. आज निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका यांसारख्या सर्व स्वायत्त संस्थांवर भाजपने कब्जा मिळवला आहे. भाजप ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट्स’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याउलट, हा देश सर्वांचा आहे आणि देशातील संपत्तीवर सर्व लोकांचा अधिकार असावा, हा काँग्रेसचा विचार आहे. संविधानानुसार देश चालला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून, या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य तसेच शाहू, फुले, आंबेडकर, संत-वारकरी संप्रदाय आणि बसवेश्वर महाराज यांचे विचार आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर त्यांना अटक करून ‘देशद्रोही’ असल्याचा अपप्रचार केला जातो. आज सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, अशी भयानक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे.’’

चौकट
विचारांची लढाई लढा !
‘‘ काँग्रेसला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण काँग्रेस कधीही संपणार नाही. या पक्षाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ज्यांनी ‘काँग्रेसमुक्त भारताचे’ स्वप्न पाहिले, तेच आज स्वतः ‘काँग्रेसयुक्त’ झाले आहेत. आपले नेते राहुल गांधी यांनी आपल्याला ‘डरो मत’ असा संदेश दिला आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला किंवा दहशतीला न घाबरता विचारांची लढाई लढा; जो लढेल तोच जिंकेल,’’ असे आवाहन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com