गीताला पसंती
अर्जुन माचिवले यांच्या
शिमगोत्सव गीताला पसंती
रत्नागिरी, ता. ३ : रत्नागिरीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या शिमगोत्सवाचा आनंद यंदा एका खास सुरावटीने द्विगुणित झाला आहे. तरवळ गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध चित्रकार-कलाशिक्षक अर्जुन माचिवले यांनी साकारलेले ‘सण आला हा कोकणचा’ हे शिमगा गीत सध्या संपूर्ण कोकणच्या ओठावर रेंगाळत आहे. या गीतामध्ये गावातील तरुण पिढीला आणि बंधू-भगिनींना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, अशा रीतीने या गीताची मांडणी करण्यात आली आहे. गीतरचनाकार आनंद घवाळी यांच्या शब्दांना सागर माचिवले यांनी पोस्टर डिझाईन व मंगेश कुळ्ये, आनंद घवाळी आणि सचिन गोरीवले यांनी ‘कोरस’ साथ केली आहे.
rat१p१२.jpg-
२६O२७८७२
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त काव्यवाचन करणाऱ्या अंतरा रायकर हिचे कौतुक करताना कल्पना शिरोळकर. सोबत जानकी घाटविलकर, अमृता नरसाळे, रूपेश पंगेरकर आदी.
----
‘पटवर्धन’मध्ये मराठी भाषा गौरव दिन
रत्नागिरी, ता. ३ : पटवर्धन हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेचा वारसा आणि तिचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कॅप्टन ठाकूर सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, प्रसिद्ध लेखिका व गीतकार अमृता नरसाळे, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, पर्यवेक्षिका कल्पना शिरोळकर आणि मराठी विभाग प्रमुख संदीप कांबळे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी अमृता नरसाळे यांनी मराठी भाषेची समृद्धी आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. तर अंतरा रायकर व गीता गायकवाड यांनी प्रभावीपणे काव्यवाचन केले. प्रीती केळकर यांनी सूत्रसंचालन केले.
----
मराठी भाषा जपा, परंपरा जपा
संजय कुळये ः मराठे महाविद्यालयात मराठी भाषा दिन
राजापूर, ता. ३ ः ‘संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीचा आरसा असते. आपण मराठी भाषा जपली तरच आपली परंपरा, लोककला, लोकगीते आणि इतिहास जिवंत राहील,’ असे प्रतिपादन ओणी येथील प्रसिद्ध कवी व गझलकार संजय कुळये यांनी केले. येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कवी संजय कुळये यांनी ‘हरवलेला गाव’, ‘शाळा’, ‘आकाश’, ‘बुद्ध’ आणि ‘वाटणी’ यांसारख्या आशयघन कवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच, त्यांनी प्रेमविषयक आणि सामाजिक जीवनावर भाष्य करणाऱ्या विविध गझला सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी तृप्ती मेजारी, तेजस्वी सावंत, सेजल आंबेलकर आणि अनुष्का फंगरेकर यांनीही स्वरचित व निवडक कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------
लोकमान्य वाचनालयातर्फे ग्रंथ प्रदर्शन
लांजा, ता. ३ ः लोकमान्य वाचनालय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिकांचे चरित्र आणि विज्ञानविषयक विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याचे उद्घाटन लांजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमान्य वाचनालय कार्यवाह उमेश केसरकर , रघुनाथ खुर्दे ,रविंद्र दळवी, प्रमिला पोटफोडे सभासद आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर लोकमान्य वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाची महती सांगितली. तर गटशिक्षणाधिकारी श्री. सावंग यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच वाचनाचे महत्त्व तसेच वाचनाने आलेले स्वानुभव कथन केले. सहाय्यक ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यवाह उमेश केसरकर यांनी आभार मानले.
---
‘खो-खो’चा प्रेरणादायी प्रवास
डेरवण येथे प्रदर्शन ; खेळाडूचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः दरवर्षीप्रमाणे यंदाही यूथ गेम्सच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या विशेष माहितीपूर्ण प्रदर्शनाने खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय खेळ ‘खो-खो’चा गौरवशाली आणि प्रेरणादायी प्रवास हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले.
डेरवण येथील क्रीडासंकुलात आयोजित या प्रदर्शनात खो-खो खेळाची केवळ नियमावलीच नव्हे, तर या खेळाचा उगम, त्यामागील पारंपरिक वारसा, कौशल्यांची शिस्त, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला ओळख मिळवून देणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा इतिहास सविस्तरपणे मांडण्यात आला आहे. जुनी छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि आतापर्यंतचे उल्लेखनीय विक्रम पाहताना अनेक उदयोन्मुख खेळाडू भारावून गेले. यापूर्वीच्या यूथ गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि स्वीमिंग या खेळांची अशीच रंजक आणि अभ्यासपूर्ण माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली होती. याबाबत खो-खो खेळाचे मार्गदर्शक विनोद मयेकर म्हणाले की, मैदानावर खेळताना खेळाडूंना मुख्यतः सराव आणि तंत्रावर लक्ष केंद्रित करावे लागते. मात्र अशा प्रदर्शनांमुळे खेळाचा इतिहास, त्यामागील संस्कृती आणि मूल्ये समजतात. खो-खोसारख्या भारतीय खेळाचे बारकावे जवळून पाहिल्यानंतर येथे सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

