रत्नागिरी-शिमगोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांचा खोळंबा

रत्नागिरी-शिमगोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांचा खोळंबा

Published on

शिमगोत्सवासाठी निघालेल्या
कोकणवासीयांचा खोळंबा

तेजस एक्स्प्रेस सात तास उशिराने; प्रवाशांचे प्रचंड हाल

रत्नागिरी, ता. १ ः कोकणचा लाडका सण असलेल्या शिमगोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून, गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, याच काळात प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या ‘मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस’चा बोजवारा उडाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी ही प्रीमियम रेल्वे ७ तास विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस शिमगोत्सवाचे वातावरण आहे. गावोगावी पालखी आणि होळीसाठी मुंबई, पुण्याहून रत्नागिरीकर गावाकडे परतत आहेत. सोमवारी शासकीय सुटी असल्यामुळे त्याचा लाभ अनेकांना झाला आहे. त्यामुळे खासगी बसेस, रेल्वे, एसटींना कोकणकरांची प्रचंड गर्दी आहे. आज ​सकाळी साडेसहा वाजता ठाणे स्थानकात येणारी तेजस एक्स्प्रेस दुपारपर्यंत न आल्याने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच उन्हाच्या झळा सोसत प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागले. शिमग्यासाठी उत्साहात निघालेल्या कोकणवासीयांच्या आनंदावर या विलंबामुळे विरजण पडले.
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, इंजिनमधील तांत्रिक बिघाड किंवा मार्गावरील तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे हा विलंब झाला असण्याची शक्यता आहे. ‘तेजस’सारख्या हाय-स्पीड रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी थांबवणे अनिवार्य असते, मात्र यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. या विलंबामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्याचा कडाका आणि पिण्याच्या पाण्यासह बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. तेजस एक्स्प्रेस ३ तासांपेक्षा जास्त उशिरा असल्यास रेल्वेच्या नियमांनुसार प्रवासी अंशतः परताव्याचा (रिफंड) दावा करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना खानपानाची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी ऐन सणाच्या तोंडावर तासन् तास ताटकळत राहावे लागल्याने चाकरमान्यांनी प्रशासनाविरुद्ध मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com