दापोली-जालगाव सरपंच कुटुंबीयांसह दुबईत सुरक्षित

दापोली-जालगाव सरपंच कुटुंबीयांसह दुबईत सुरक्षित

Published on

- rat1p50.jpg
28034
दुबई ः येथे असलेले अक्षय फाटक, श्रिया व शुभदा साठे.

दुबईतील नातेवाइकांसाठी
रत्नागिरी प्रशासनाचा विशेष कक्ष

युद्धाचा परिणाम; जालगाव सरपंच कुटुंबीयांसह सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी/दापोली, ता. १ ः जालगाव (ता. दापोली) ग्रामपंचायतीचे सरपंच तथा उद्योजक अक्षय फाटक हे सध्या दुबई येथे असून, ते व त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इस्राईल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी फाटक कुटुंबीय सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक किंवा परिचित या देशांमध्ये वास्तव्यास आहेत, त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. संबंधितांना भारतात आणण्यासाठी दूतावासामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आली.
जालगाव सरपंच अक्षय फाटक हे कामानिमित्त दुबई येथे गेले असून, त्यांच्या समवेत कन्या श्रिया फाटक आणि आत्या शुभदा साठे यादेखील दुबईत आहेत. दरम्यान, इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम दुबईपर्यंत जाणवत आहेत. दुबईतील अमेरिकन दूतावासावर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून, काही काळासाठी विमान उड्डाणे स्थगित केल्याचे वृत्त आहे. याबाबत सरपंच अक्षय फाटक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण, श्रिया आणि शुभदा सुरक्षित असल्याचे सांगितले. सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असून, भारतीय नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
दरम्यान, फाटक यांच्या पत्नी स्नेहा फाटक या दापोली येथे असून, त्यांनीही कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती दिली. काळजी करण्याचे कारण नाही. प्रशासन व दूतावासाशी संपर्क सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्य पूर्व आणि परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत सरकारने तेथील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षेबाबत सूचना जारी केल्या आहेत. या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक किंवा परिचित या देशांमध्ये वास्तव्यास आहेत, त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक माहिती प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयातील (मुंबई) आपत्कालीन संचालन केंद्राशी समन्वय साधण्यात आला असून, परदेशात अडकलेल्या किंवा वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबतची माहिती नातेवाइकांना कळविली जाईल. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता, परदेशात असलेल्या आपल्या नातेवाइकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिंदल यांनी केले आहे.

-----
चौकट

येथे साधा संपर्क (नियंत्रण कक्ष):
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय : ०२३५२- २२२२३३ / मो. ७०५७२२२२३३
रत्नागिरी पोलिस नियंत्रण कक्ष : ०२३५२- २२२२२२
मुंबई, मंत्रालय नियंत्रण कक्ष : ०२२- २२०२७९९० / मो. ९३२१५८७१४३

-------
कोट
फाटक कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी दुतावासाशी संपर्क साधण्यात आला असून, पुढील सूचना मिळेपर्यंत संबंधितांनी ज्या ठिकाणी आहेत तिथेच सुरक्षित राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. भारतीय दूतावासानेही दुबईस्थित भारतीयांनी अनावश्यक बाहेर पडू नये, तसेच अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. आवश्यक ती सुरक्षा व मदत पुरविण्यात येईल, असेही दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- अर्चना बोंबे, तहसीलदार, दापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com