‘ती’चा भवताल
‘ती’चा भवताल---------लोगो
(११ फेब्रुवारी टुडे ३)
जिच्या हाती स्वच्छतेची दोरी,
ती जिल्ह्यासी उद्धारी
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ‘महिलाराज’ आले आहे. या रणरागिणींनी आता जिल्ह्याच्या स्वच्छतेसाठी पदर खोचून, हातात स्वच्छतेची सळसळती तलवार घेऊन कामाला लागणे ही काळाची गरज आहे. ‘जिच्या हाती स्वच्छतेची दोरी, ती जिल्ह्यासी आणि जगासी उद्धारी’ असे मानून आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
---
सद्यःस्थितीत कचऱ्याचा प्रश्न केवळ महाराष्ट्रासमोरच नव्हे, तर जागतिक स्तरावर ‘आ’ वासून उभा आहे. रत्नागिरी जिल्हाही याला अपवाद नाही. प्रत्येक तालुकास्तरावर कचऱ्याच्या प्रश्नाने रौद्र रूप धारण केले आहे. जिल्ह्याचे निरीक्षण केल्यास एक महत्त्वाची गोष्ट समोर येते- रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य नऊ शहरांपैकी सात ठिकाणी महिला नगराध्यक्षांच्या हाती सत्तेची सूत्रे आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या एकूण ५८ जागांपैकी २८ जागांवर महिला सदस्य निवडून आल्या आहेत. म्हणजेच संपूर्ण जिल्ह्याच्या सार्वजनिक स्वच्छतेची धुरा आता या महिला प्रतिनिधींच्या हातात आहे.
स्त्रियांचा जन्मजात ‘नीटनेटकेपणा’ हा गुण लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हा कचरामुक्त होण्यासाठी आता वेगाने पावले पडतील, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. प्रशासकीय स्तरावर कचरा विघटन आणि दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी नसणे, जनजागृतीचा अभाव आणि नागरिकांना कचरा विलगीकरणाची सवय नसणे, यामुळे हा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत गंभीर झाला आहे. अनेक सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी या विषयात काम करत असले, तरी लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. यात बदल घडवण्यासाठी आता आपल्या माता-भगिनींनी घराप्रमाणेच आपला वॉर्ड, गाव, शहर आणि जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
*जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर:
या मोहिमेसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येईल. ‘कचरामुक्त मी’, ‘कचरामुक्त घर’, ‘नगर’, ‘शाळा’ आणि ‘कार्यालय’ अशा विविध मोहिमा राबवता येतील. तसेच, धार्मिक स्थळे आणि जत्रा-उत्सवांमध्ये पर्यावरणपूरक साजरे करण्याबाबत कडक निर्बंध घालणे गरजेचे आहे. ‘केल्याने होत आहे रे...’ या उक्तीनुसार काम केल्यास उद्याची पहाट नक्कीच स्वच्छ आणि सुंदर असेल.
*हे करावे लागेल?
कचरा प्रश्न सर्वांनी मनावर घेतला तर सहज सुटू शकतो. मुळात आपण ज्याला ‘कचरा’ म्हणजे, ते दुसऱ्या एखाद्या वस्तूचे ‘कच्चे माल’ (Raw Material) असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यासाठी खालील उपाययोजना करता येतील:
* मानसिक बदल : वॉर्डनिहाय बैठका घेऊन प्लास्टिक कचऱ्याचे निसर्गावर होणारे भयानक परिणाम समजावून सांगणे.
* संकलन केंद्रे : प्रत्येक वॉर्डच्या भौगोलिक परिस्थितीनुसार एक किंवा दोन कचरा संकलन केंद्रे निर्माण करणे.
* सवलती व दंड : जे नागरिक स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करतील, त्यांना घरपट्टीमध्ये विशेष सवलत द्यावी. याउलट, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या आधारे दंडात्मक कारवाई करावी.
* शाळा-महाविद्यालयांचा सहभाग : शैक्षणिक संस्थांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे. तरुण मंडळे आणि विद्यार्थ्यांद्वारे घरोघरी जाऊन कचरा वर्गीकरणाचा प्रचार करणे.
* कला व संस्कृतीचा वापर : पत्रलेखन, पथनाट्ये, संत गाडगेबाबा भजन स्पर्धा आणि समूहगान स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवणे.
* सामूहिक स्वच्छता अभियान : गटारे, नद्या, नाले आणि मैदाने स्वच्छ करण्यासाठी महिला मंडळे, बचत गट आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने १५ दिवसांतून एकदा स्वच्छता मोहीम राबवणे.
* किनारा स्वच्छता : समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सीएसआर (CSR) फंडाचा वापर करणे.
या सर्व कचरामुक्तीच्या कार्यात दापोलीतील ‘निवेदिता प्रतिष्ठान’ सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. येणाऱ्या महिला दिनानिमित्त संपूर्ण रत्नागिरी जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी ठोस कार्यक्रमांची आखणी करणे हीच काळाची गरज आहे.
-----
(लेखक पर्यावरणाचा शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत)

