चहा-बिस्किटे खाण्यासाठी बोलावले का0
swt311.jpg
28218
सावंतवाडी ः रुग्ण कल्याण समिती बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारताना देव्या सूर्याजी व इतर.
चहा-बिस्किटे खाण्यासाठी बोलावले का?
‘रुग्ण कल्याण’ सभेत संताप : सावंतवाडीत प्रमुख अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समिती बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित राहत नसतील, तर फक्त चहा-बिस्किटे खाण्यासाठी बैठक आयोजित केली जाते का? असा सवाल रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी नगरसेवक देव्या सूर्याजी व समिती सदस्य रवी जाधव यांनी केला. आरोग्यासारख्या गंभीर प्रश्नांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात आज रुग्णकल्याण समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्ह्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौगुले, रुग्ण कल्याण समिती सदस्य, आमदार प्रतिनिधी नगरसेवक देव्या सूर्याजी, सदस्य रवी जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. सूर्याजी व श्री. जाधव यांनी सभेला प्रशासकीय अधिकारी उपस्थित न राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आरोग्यासारख्या गंभीर प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आस्था नसेल तर या बैठका कशासाठी लावायला हव्यात?’ असा सवाल त्यांनी केला. पुढच्या बैठकीस अधिकारी उपस्थित नसतील तर बैठक होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या बैठकीत आरोग्य समस्या, उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्था व फिजिशियन व भूलतज्ज्ञांच्या नेमणुकीबाबत पाठपुरावा करण्यासाठी चर्चा करण्यात आली. डॉ. वजराटकर सेवानिवृत्त झाले असून डॉ. ऐवळे देखील निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी रुग्ण कल्याण समिती सदस्यांनी केली. यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, सार्वजनिक बांधकामचे विनोद चव्हाण, रुग्णालय कर्मचारी आर. एस. शिंदे, रुपाली हेळेकर, अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

