डिझेल परताव्यातून वर्षभरात 20 कोटी 18 लाख प्राप्त

डिझेल परताव्यातून वर्षभरात 20 कोटी 18 लाख प्राप्त

Published on

डिझेल परताव्यातून वर्षभरात
२० कोटी १८ लाख प्राप्त
मच्छीमारांना दिलासा; १,१६६ यांत्रिक नौकांना मिळतो लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : यांत्रिक नौकांसाठी मच्छीमार सहकारी संस्थांच्या सदस्यांनी वापरलेल्या डिझेलवरील परताव्यापोटी २०२५-२६ या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यासाठी आतापर्यंत २० कोटी १८ लाख ३९ हजार ९७५ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ही योजना कार्यान्वित असून शासनाकडून मिळालेले पैसे थेट मच्छीमारांच्या बँक खात्यात जमा केले जातात, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा वर्षभरात जिल्ह्यातील २६ मच्छीमार सहकारी संस्थांच्या १ हजार १६६ यांत्रिक नौकांसाठी ३१ हजार ८९५.३९ किलो लिटर डिझेल कोटा मंजूर झाला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ६ कोटी ३० लाख ४४ हजार २८१ रुपये इतका निधी ६७५ नौकामालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये शासनाच्या आदेशानुसार १३ कोटी ८७ लाख ९५ हजार ६९४ रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही टप्प्यांतील निधीची एकत्रित रक्कम सुमारे २०.१८ कोटी रुपये इतकी आहे. कोषागाराची प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
सध्या जिल्ह्यातील २५ मच्छीमार सहकारी संस्थांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यासाठी सुमारे ६.३६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होताच प्राधान्यक्रमानुसार उर्वरित पात्र मच्छीमारांना प्रतिपूर्तीची रक्कम अदा करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही योजना मच्छीमारांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले.

चौकट
नऊ वर्षांत मिळाले २१२ कोटी
गेल्या ९ वर्षांतील प्राप्त निधीकडे पाहिले असता या योजनेअंतर्गत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. २०१६-१७ मध्ये १९ कोटी ३५ लाख, २०१७-१८ मध्ये १४ कोटी ९३ लाख, २०१९-२० मध्ये ९ कोटी व १६ कोटी ३५ लाख, २०२०-२१ मध्ये १३ कोटी ५३ लाख, २०२१-२२ मध्ये २२ कोटी ३ लाख, २०२२-२३ मध्ये ३० कोटी ८५ लाख, २०२३-२४ मध्ये ६० कोटी ९९ लाख आणि २०२४-२५ मध्ये २५ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. या सर्व वर्षांचा एकत्रित विचार केला असता अंदाजे २१२.३८ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com