पर्यटन, व्यापाराला ‘रो-रो’मुळे नवी दिशा
पर्यटन, व्यापाराला
‘रो-रो’मुळे नवी दिशा
मालवण ः महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे, की मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतीक्षित रो-रो सेवा जनतेच्या सेवेत दाखल झाली आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १ मार्चला सकाळी ८ वाजता भाऊंचा धक्का, मुंबई येथून पहिली रो-रो विजयदुर्गकडे मार्गस्थ झाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांचे आभार मानायला हवेत.
---
हळवल येथे शुक्रवारी
‘सुरत चंद्रिका’ नाटक
कणकवली ः शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. ६) ‘शिवजन्मोत्सव २०२६’ सोहळ्याचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे हे ३८ वे वर्ष असून दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता शिवछत्रपतींच्या महापूजनाने होईल. सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, रात्री ८ वाजता आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्रदान सोहळा होणार, ८.३० वाजता ‘सुरत चंद्रिका’ हे दशावतारी नाटक वालावलकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून होणार आहे.
-----
मालवण येथे उद्या
निवृत्त शिक्षक मेळावा
ओरोस : जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या येथील शाखेचा निवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांचा वार्षिक स्नेहमेळावा गुरुवारी (ता. ५) होणार आहे. तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता, जानकी मंगल कार्यालय, कुंभारमाठ येथे हा मेळावा होईल. या कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षात निवृत्त शिक्षकांचा, वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येईल. तालुक्यातील सर्व निवृत्त शिक्षकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष चौकेकर यांनी केले आहे.
....................
‘उद्यानविद्या’तर्फे
वेतोरेत विजय बंधारा
वेंगुर्ले ः कोकण पट्ट्यात फेब्रुवारीपासून भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची नितांत गरज लक्षात घेऊन उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या पुढाकाराने वेतोरे येथे कोकण विजय बंधारा (वनराई बंधारा) यशस्वीरित्या उभारण्यात आला. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात साठवलेले पाणी दीर्घकाळ उपलब्ध राहून भूजल पातळी वाढीस लागणार आहे. उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होणार आहे. जलसंधारण व शाश्वत शेती विकासाचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
......................
माडखोल धवडकी येथे
७ पासून क्रिकेट स्पर्धा
ओटवणे ः केसरी धनगर समाजाच्यावतीने ७ व ८ मार्चला माडखोल धवडकी चिले मैदान येथे ‘एक गाव एक संघ’ मर्यादित भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चषक-२०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश दिला आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये आणि आकर्षक चषक तसेच बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी जनार्दन लांबर आणि प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विलास जंगले आणि संदीप पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

