पान एक-वेंगुर्लेत तरुणाला दहा लाखाला गंडा
वेंगुर्लेत तरुणाला दहा लाखाला गंडा
पैशांचे आमिष : कणकवलीतील दोघींवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ : गेमिंग ॲपमधून पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने कणकवली येथील दोन महिलांनी शहरातील एका तरुण व्यावसायिकाची नऊ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने वेंगुर्ले पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली असून, दोन्ही महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कणकवली येथील ३० व ३६ वर्षीय दोन महिलांनी येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये संबंधित व्यावसायिकाची भेट घेतली. त्यांनी त्याला एका गेमिंग ॲप्लिकेशनची माहिती दिली. ‘या ॲपमध्ये पैसे गुंतविल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल,’ असे आमिष दाखवून त्यांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एका महिलेने दिलेल्या एका मोठ्या खासगी बँकेच्या डोंबिवली (पूर्व) शाखेतील खात्यावर नऊ लाख ९० हजार रुपये ‘आरटीजीएस’द्वारे भरण्यास सांगितले. त्याने ही रक्कम भरली. यानंतर काही काळातच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांत तक्रार दिली. सध्या वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
..................
चौकट
व्याप्ती मोठी असल्याची शक्यता
काही काळापूर्वी रेडी येथील एका युवकाचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले होते. वेंगुर्ला तालुक्यात अशा घटना वारंवार घडत असून, तरुण वर्ग झटपट पैसे मिळविण्याच्या नादात आपली मोठी आर्थिक हानी करून घेत आहेत. अशा ‘भामट्या’ महिलांपासून आणि फसव्या योजनांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

