शिक्षण, संस्कारांचा वारसा अखंड ठेवू
28545
शिक्षण, संस्कारांचा वारसा अखंड ठेवू
घारपीवासीयांचा निर्धार; जिल्हा परिषद शाळेचा सत्तरावा वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः सह्याद्री पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेल्या घारपी गावाचा अभिमान व ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सत्तरावा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
१ मार्च १९५६ ला स्थापन झालेल्या या शाळेने शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत सात दशकांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला. वर्धापन दिनानिमित्त आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ, अबालवृद्ध यांच्यासह संपूर्ण गाव एकत्र आले होते. त्यामुळे रविवारी सुटीचा दिवस असूनही शाळा परिसर फुलून गेला होता. नोकरी निमित्ताने बाहेर गावी असलेले माजी विद्यार्थीही स्नेहमेळाव्याला आवर्जून उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत माजी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आकर्षक रांगोळ्या, पानाफुलांचे तोरण व फुगे यांनी शाळा परिसर सुशोभित केला होता. शाळेच्या ७० वर्षांच्या कार्याचा गौरव म्हणून ७० पणत्या प्रज्वलित केल्या. मान्यवरांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा झाला. मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांचे झाडाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण केले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, स्वाती गावडे, दीपक गावडे, विजय गावकर, जानकी गावडे, हरिभाऊ गावडे, मधुकर गावडे, मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत, पोलिसपाटील समृद्धी गावडे, आशा सेविका उत्तरा नाईक आदींनी परिश्रम घेतले.
---
स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी जपण्यासाठी एकत्रित फ्लेक्सबोर्डवर स्वाक्षरी घेण्यात आल्या. सत्तर वर्षांचा हा प्रवास केवळ एका शाळेचा नसून, घारपी गावाच्या प्रगतीचा आणि शैक्षणिक उन्नतीचा साक्षीदार आहे. यावेळी शाळा परिसरात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नव्याने दुरुस्ती झालेल्या इमारतीचे फित कापून उद्घाटन झाले. विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित केले. शाळेसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

