इंधन तुटवड्याचा रत्नागिरीत विनाकारण बाऊ

इंधन तुटवड्याचा रत्नागिरीत विनाकारण बाऊ

Published on

rat4p6.jpg-
28512
रत्नागिरी ः शहरातील रहाटाघर येथील पेट्रोलपंपावर दुचाकीधारकांच्या पेट्रोलसाठी लागलेल्या रांगा.

इंधन तुटवड्याची अफवा, रांगा मात्र खऱ्या !
रत्नागिरीत विनाकारण बाऊ; पेट्रोलपंपांवर गर्दी ; देशात ७४ दिवस पुरेल एवढा इंधनसाठा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : इराण, इराक आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांनी रत्नागिरी शहरातील पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत; मात्र ऑईल कंपन्यांकडून नियमित इंधन पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी भारतात पुढील ७४ दिवस पुरेल इतका पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या चर्चेने जोर धरल्याने रत्नागिरीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परिणामी, दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोलपंपांकडे धाव घेतली. शहरातील माळनाका, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, रहाटाघर येथील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊन सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. काल (ता. ३) शिमगोत्सवामुळे रत्नागिरी शहरातील दोन पेट्रोलपंप बंद होते. त्यामुळे रत्नागिरीत खुल्या असलेल्या पंपांमध्ये इंधन भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात नियमित इंधन पुरवठा सुरू असल्यामुळे परिस्थिती सुरळीत आहे; मात्र याला रत्नागिरी शहर अपवाद ठरले आहे. शहरात इंधन पुरवठ्याचा वाहनधारकांनी विनाकारण बाऊ केला आहे. त्यामुळे अनेक पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील इंधन स्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भारताची इंधन साठवणूक यंत्रणा भक्कम असून, कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीचा तत्काळ परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावर होणार नाही. भारताकडे सध्या ७४ दिवस अखंडित पुरवठा होईल इतका साठा राखीव आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून इंधन खरेदी करण्याची कोणतीही गरज नाही, असे स्पष्ट केले आहे.


चौकट
विनाकारण अफवा पसरवू नका
रत्नागिरीत निर्माण झालेल्या या परिस्थितीची दखल घेत स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले की, जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत आहे. पेट्रोलपंपांवर साठा संपलेला नाही. काही पंप काल होळीमुळे बंद होते आता ते पुन्हा सुरू झाले आहेत. एकाच वेळी गर्दी झाल्याने वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. ‘‘विनाकारण अफवा पसरवू नका आणि पंपांवर रांगा लावून इतरांची अडचण करू नका,’’ असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोट १
जिल्ह्यात कुठेही पेट्रोलपंपांवर रांगा नाहीत, होळीमुळे काही पंप बंद होते; परंतु रत्नागिरीत विनाकारण काही पंपांवर रांगा लागल्या आहेत. अशी परिस्थिती काही निर्माण झालेली नाही. भारताकडे पुढील ७४ दिवस इंधन पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे वाहनधाराकांनी विनाकारण गर्दी करण्याची गरज नाही. नियमित इंधन पुरवठा सुरू राहणार आहे.
- उदय लोध, राष्ट्रीय अध्यक्ष सीआयपीडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com