हत्तीप्रश्नी आता वनविभागाशी संघर्ष
28621
हत्तीप्रश्नी आता वनविभागाशी संघर्ष
रणनीती ठरली; हत्तीबाधित गावांची ‘संघर्ष समिती’ स्थापन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ४ : काजू हंगामात हत्तींच्या मुक्त संचारामुळे होणारे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन, शेतकऱ्यांनी आता वनविभागाशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही आमदार, पालकमंत्री आणि खासदार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याचा निर्णय आज केर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तिलारी खोऱ्यातील हत्तीबाधित गावांची एक ‘संघर्ष समिती’ स्थापन करण्याचे ठरले असून, सध्या १३ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. इतर गावांतील प्रतिनिधींचा समावेश करून लवकरच ही समिती पूर्ण केली जाईल.
केर येथे ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्यात आयोजित बैठकीस शिवसेना नेते राजेंद्र निंबाळकर, शिवसेना सावंतवाडी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रेमानंद देसाई, मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस, केरचे उपसरपंच तेजस देसाई, तुकाराम देसाई, रत्नकांत देसाई, हर्षद देसाई, विष्णू देसाई, शिवराम देसाई, सगुण नाईक, शंकर देसाई, मंगेश देसाई, राघोबा देसाई, नारायण देसाई, महेंद्र देसाई, प्रकाश देसाई, अनंत देसाई, पोलिसपाटील सर्वेश देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्यक्ष आंदोलन छेडण्यापूर्वी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे यांची भेट घेतली जाईल. त्यांना या जिल्हाव्यापी प्रश्नाचे गांभीर्य आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्याचे बैठकीत ठरले. याबाबत खासदार श्री. राणे यांची वेळ घेणार असल्याचे श्री. निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थांनी २०१८ पासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा पाढा वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वाचला. दरवेळी तेच प्रश्न आणि वनविभागाची तीच जुनी उत्तरे येत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘इथून पुढे ग्रामस्थांना भेटायचे असेल, तर ठोस निर्णय घेण्याची क्षमता असणारे अधिकारीच चर्चेला यावेत, अन्यथा बैठका घेऊ नका,’’ असा सज्जड दमही शेतकऱ्यांनी दिला.
.....................
धोरणात्मक निर्णयासाठी मोठा लढा उभारणार
शेतकऱ्यांचे हे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. दरवर्षी काजू हंगामात हत्ती येतात. मात्र, ‘‘काजू नुकसानीसाठी भरपाईची तरतूद नाही,’’ असे सांगून वनविभाग हात झटकतो. आता केवळ आश्वासने नकोत, तर कायमस्वरुपी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी मोठा लढा उभारण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

