सदर

सदर

Published on

पैसा बोलतो, आपण ऐकतो! लोगो
(२७ फेब्रुवारी टुडे ३) फोटोसह घ्या
बचत की गुंतवणूक?

‘पैसे साठवत जा’ हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यामुळे ‘बचत’ ही सवय म्हणून आपल्यात खोलवर रुजली आहे. उत्पन्नातून आधी बचत करायची आणि उरलेले पैसे खर्च करायचे, हा आपल्या रोजच्या सवयीचा भाग असतो. बँकेत पैसे ठेवले की मनाला समाधान वाटते. ही सवय चुकीची नाही; उलट ती आवश्यकच आहे. पण इथेच अनेक वेळा गोंधळ होतो; कारण ‘बचत’ आणि ‘गुंतवणूक’ या दोन वेगवेगळ्या संकल्पना असूनही आपण त्या एकाच अर्थाने वापरतो. त्यातील फरक नेमका काय, हे समजावून घेऊया...

- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
---------


बचत म्हणजे आजचा पैसा सुरक्षित ठेवणे. तिचा उद्देश स्थैर्य आणि तत्काळ उपलब्धता (Liquidity) हा असतो. अचानक उद्भवणारे आजारपण, नोकरीतील अनिश्चितता किंवा घरातील एखादी तातडीची गरज अशा प्रसंगी बचत उपयोगी पडते. यासाठी आपत्कालीन निधी, बचत खाते किंवा अल्पकालीन ठेवी यांना अर्थसाक्षरतेत महत्त्व दिले जाते. बचत आपल्याला मानसिक शांतता देते आणि आर्थिक धक्के सहन करण्याची ताकद वाढवते.
परंतु, महत्त्वाचा मुद्दा असा की, केवळ बचत म्हणजेच आर्थिक वाढ असे मात्र नसते. कारण बचतीवर मिळणारा परतावा बहुतांश वेळा मर्यादित असतो आणि जेव्हा महागाईचा दर त्यापेक्षा जास्त किंवा आसपास असतो, तेव्हा आकड्यांनी पैसा वाढत असला, तरी त्या पैशातून विकत घेता येणाऱ्या वस्तूंची संख्या फारशी वाढत नाही. इथेच गुंतवणुकीची गरज पुढे येते.
गुंतवणूक म्हणजे आजचा पैसा भविष्यासाठी कामाला लावणे. तिचा उद्देश ‘मूल्यवृद्धी’ हा असतो. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, दीर्घकालीन योजना, व्यवसाय किंवा मालमत्ता या सर्व माध्यमांमध्ये पैसा वाढवण्याची क्षमता असते. पण त्याचबरोबर त्यात अनिश्चितताही असते. म्हणूनच गुंतवणूक म्हणजे खात्रीचा नफा नव्हे; तर ती संभाव्य वाढ असते.
इथेच एक महत्त्वाचा आर्थिक नियम समजून घेणे आवश्यक आहे. जोखीम आणि सुरक्षितता यांचे प्रमाण व्यस्त असते, तर जोखीम आणि परतावा यांचे प्रमाण थेट (सरळ) असते. जिथे सुरक्षितता जास्त, तिथे जोखीम कमी आणि पर्यायाने परतावाही कमी असतो. याउलट जिथे सुरक्षितता कमी, तिथे जोखीम जास्त आणि परतावाही जास्त असतो. उदाहरणार्थ, राष्ट्रीयीकृत बँकेतील बचत खाते किंवा मुदत ठेव अत्यंत सुरक्षित असते, पण त्यावर मिळणारा परतावा कमी असतो. दुसरीकडे, शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षिततेच्या दृष्टीने अनिश्चित असू शकते, पण दीर्घकालीन परताव्याची क्षमता त्यात जास्त असते. म्हणूनच अर्थसाक्षरतेचा अर्थ निव्वळ ‘जास्त परतावा मिळवायचा’ असा नसून, आपल्याला किती जोखीम परवडू शकते, हे ओळखणे असा असतो.
याच ठिकाणी अनेकांना भीती वाटते; कारण गुंतवणूक म्हटले की तोटा, बाजार घसरणे, फसवणूक अशा गोष्टी आठवतात. प्रत्यक्षात मात्र प्रश्न ‘गुंतवणूक करावी की नाही’ हा नसून ‘ती कशी करावी’ हा असतो. जोखीम टाळता येत नाही; पण तिचे व्यवस्थापन मात्र नक्की करता येते. पैसा फक्त बँकेत ठेवणे हीदेखील एक प्रकारची जोखीमच आहे, कारण महागाईमुळे त्याची क्रयशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे जोखीम शून्य नसते; ती फक्त वेगवेगळ्या स्वरूपात आणि प्रमाणात असते.
म्हणूनच निर्णय घेताना संतुलन महत्त्वाचे ठरते. अल्पकालीन गरजांसाठी बचत आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक हा समतोल साधणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, पुढील सहा महिन्यांचा घरखर्च बचतीत असावा; पण मुलांचे शिक्षण, निवृत्ती किंवा दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्य यासाठी गुंतवणूक आवश्यक ठरते. सर्व पैसे गुंतवणुकीत घालणे धोकादायक आहे आणि सर्व पैसे फक्त बचतीत ठेवणेही दीर्घकाळात तोट्याचे ठरू शकते.
बचत आणि गुंतवणूक यांमधला फरक समजल्यावर आर्थिक निर्णय अधिक स्पष्ट होतात. कोणत्या पैशाला कधी हात लावायचा आणि कधी नाही, कोणत्या पैशाला वाढीसाठी वेळ द्यायचा आणि कोणत्या पैशाने जोखीम घ्यायची, हे ठरवता येते. त्यामुळे आर्थिक नियोजन भावनिक न राहता वास्तववादी होते. महागाईच्या पार्श्वभूमीवर पाहिले, तर गुंतवणूक ही चैनीची गोष्ट नसून गरज बनली आहे. पण ती अंधपणे न करता, उद्दिष्टांनुसार, कालावधी लक्षात घेऊन आणि स्वतःच्या जोखीम क्षमतेनुसार करणे हेच अर्थसाक्षर व्यक्तीचे लक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com