शेतकरी कुटुंबाची कथा ''भिरुड''
- rat५p१.jpg-
२६O२८७२१
रत्नागिरी ः झाड जीवन फाउंडेशन या संस्थेने केलेल्या ‘भिरुड’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
----
शेतकरी कुटुंबाची कथा ‘भिरूड’
जीवन फाउंडेशनचे सादरीकरण; अभिनयाला रसिकांची दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : ‘भिरूड’ या शीर्षकाप्रमाणेच परिस्थितीच्या भोवऱ्यात अडकलेला शेतकरी आणि त्याचे कुटुंब नाटकात चितारले आहे. मात्र, हे नाटक एक आशावादी संदेश देते. आधुनिक तंत्रज्ञान, जिद्द आणि स्वाभिमान यांच्या जोरावर शेतीतूनही यश मिळवता येते. समाजातील हुंड्यासारख्या चुकीच्या प्रथा नाकारून योग्य मूल्ये स्वीकारली, तर बदल शक्य आहे, हा सकारात्मक संदेश या नाटकातून दिला आहे.
----
‘भिरूड’ हे दोन अंकी नाटक ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि बदलत्या विचारसरणीचे चित्रण करते. वसंत हा बीएस्सी ॲग्री (B.Sc. Agri) शिकलेला, आधुनिक शेती पद्धती वापरणारा तरुण आहे. त्याने शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा भाऊ सागर मात्र शेतीतील अनिश्चित उत्पन्न, वाढते कर्ज आणि आर्थिक ताण यामुळे शेतीविरोधी भूमिका घेतो. तो जमीन विकून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा विचार करतो.
घरात बहिणीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होतो. हुंड्याच्या अपेक्षेमुळे आणि बँकेच्या कर्जफेडीच्या तगाद्यामुळे वसंत अडचणीत सापडतो. बँकेकडून जप्तीची नोटीस येते. सागरकडे कर्जफेडीसाठी पैसे असूनही तो मदत करत नाही, त्यामुळे घरातील तणाव वाढतो. दरम्यान, वसंतचे त्याची मैत्रीण सारिका हिच्यावर प्रेम असते; परंतु तिच्या कुटुंबाला शेतकरी मुलगा नको असतो. ती वसंतला जमीन विकून नोकरी करण्याचा सल्ला देते.
नाटकाच्या शेवटी बहीण हुंडा नको असल्याचे स्पष्ट सांगते आणि शेतकरी मुलाशीच लग्न करण्याची तयारी दर्शवते. यामुळे कुटुंबाला नवी दिशा मिळते. वसंत, लहान भाऊ सागरने बँकेचा हप्ता भरण्यासाठी दिलेले पैसे पुण्यातील फ्लॅटसाठी देऊन टाकतो आणि ‘माझ्या वाटणीचा हिस्सा मला द्या’ असे सांगून घर सोडून जातो. एके दिवशी निसर्गाचा कोप होतो आणि अवकाळी पावसाने वसंतच्या शेतीचे मोठे नुकसान होते. या नैराश्यातून तो आत्महत्या करतो. बँकेचे कर्ज थकीत असल्यामुळे जमिनीवर जप्ती येते आणि केवळ तीन एकर जमीन शिल्लक राहते. शेवटी सागर म्हणतो की, ‘वसंतचे शेतीचे स्वप्न मी पूर्ण करणार, त्या जागेत पॉलिहाऊस बांधून शेती करू.’ त्याचवेळी आप्पांना नोटीस येते; त्यांच्या बहिणीने उर्वरित जमिनीत हिस्सेदार म्हणून मालकी हक्काची मागणी केलेली असते. हे पाहून आप्पा उद्विग्न होऊन कोलमडतात.
या नाटकातून शेती, स्वाभिमान आणि कष्ट यांची किंमत अधोरेखित होते. हे नाटक ग्रामीण समाजातील वास्तव मांडते. शेतीतील अस्थिरता, वाढते कर्ज, बँकांची वसुली, हुंडा प्रथा, शिक्षणामुळे बदलणारी मानसिकता आणि शहरांकडे वाढलेली ओढ या सर्व समस्यांचा यात ऊहापोह केला आहे.
--------
नेपथ्य आणि साहाय्य
नेपथ्य- शुभम गडे, देविका भोसले; प्रकाश योजना- संकेत मोडक; पार्श्वसंगीत- प्रणव भोसले, रोहित महादवे; वेशभूषा- श्रुती सूर्यवंशी; रंगभूषा- अमृता जगताप, श्रुती सूर्यवंशी.
---
पात्र परिचय
आप्पा- सचिन अर्जुन, वसंत- प्रणव भोसले, आई- हेमांगी काकडे, सागर- वैभव बाठे, तायडी- श्रुती सूर्यवंशी, सारिका- प्राजक्ता मरगणे, मोहिते- तुषार सक्सेना, गोविंदा- शुभम गाडे, सरपंच- स्वप्निल निंबाळकर, आमदार- ऋषीकेश गावडे, जोगतीन- मीनाक्षी गोलपल्ली, पोस्टमन- सूरज दानवले, सोमा- सारंग सूर्यवंशी, आबा- श्रेयस सुतार.

