महिनाभरात जयगड येथे रो-रो फेरीला अधिकृत थांबा

महिनाभरात जयगड येथे रो-रो फेरीला अधिकृत थांबा

Published on

जयगड येथे रो-रो फेरीला अधिकृत थांबा
मंत्री नीतेश राणे ः रत्नागिरीकरांना लवकरच दिलासा, पर्यटनाला चालना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या ‘रो-रो फेरी सेवे’मुळे कोकणवासियांना दिलासा मिळाला असून, आता या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. येत्या एका महिन्यात रत्नागिरीतील जयगड येथे रो-रो फेरीला अधिकृत थांबा मिळणार आहे. यासोबतच देवगड आणि वेंगुर्ला येथील जेटींची कामेही अंतिम टप्प्यात असून लवकरच या तिन्ही ठिकाणी जलवाहतूक सेवा सुरू होईल, अशी माहिती बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
मुंबई-विजयदुर्ग मार्गावर धावणाऱ्या या रो-रो सेवेला कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाच्या बंदरांवर थांबा देण्याची मागणी सातत्याने होत होती. या संदर्भात मंत्री नीतेश राणे म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या (सागरी महामंडळ) माध्यमातून जयगड, देवगड आणि वेंगुर्ला या तिन्ही ठिकाणच्या जेट्टींचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. तांत्रिक कामे आणि सुरक्षेच्या सर्व परवानग्या मिळताच महिनाभरात हे थांबे प्रवाशांसाठी खुले केले जातील. यामुळे मुंबई-कोकण जलवाहतुकीचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
महायुती सरकारने कोकणातील पर्यटन उद्योगाला गती देण्यासाठी या जलवाहतूक प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. तसेच मुंबई ते नेरूळ जलवाहतूक सेवाही लवकरच सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
----
हर्णैतील थांब्यासाठीही प्रयत्न
दापोलीतील हर्णै येथेही रो-रो सेवेला थांबा मिळावा, अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली मंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील मागणीचे पत्र त्यांनी नुकतेच दिले आहे. याठिकाणी बोट सेवा सुरू झाली, तर पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
----
चौकट
पर्यटन आणि व्यापाराला मिळणार गती
जयगड हे औद्योगिक आणि बंदर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. येथे रो-रो ला थांबा मिळाल्यास स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. देवगड आणि वेंगुर्ला येथील थांब्यांमुळे मालवण, तारकर्ली, आचरा यांसारख्या पर्यटनस्थळांना भेट देणे पर्यटकांना अधिक सोयीचे होईल. स्वतःच्या मोटार किंवा दुचाकीसह रो-रो फेरीतून प्रवास करता येत असल्याने, पर्यटकांना कोकणात पोहोचल्यावर वेगळ्या वाहनाची सोय करण्याची गरज भासणार नाही. यामुळे प्रवासाचा खर्च कमी होऊन पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com