कोंडगेत अवैध दारूविक्री पुन्हा सुरू
कोंडगेतील दारूविक्री बंद करा
सरपंच आक्रमक ; ग्रामसभेत ‘दारूबंदी’चा ठराव
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ५ ः लांजा तालुक्यातील कोंडगे पंचक्रोशीत बंद झालेली गावठी व विदेशी दारूची अवैध विक्री पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत असून, हे धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच डॉ. एस. व्ही. कदम यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिला आहे.
कोंडगे गावात गेल्या १५ वर्षांपासून अवैध दारूविक्रीचे सत्र सुरू आहे. या व्यसनामुळे अनेक संसार उघड्यावर आले असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. हे धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत २५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ‘दारूबंदी’चा एकमुखी ठराव संमत केला होता. ग्रामसभेच्या ठरावानंतर लांजा पोलीस स्थानक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. यामध्ये संबंधित धंदेवाल्यांच्या नावांचाही उल्लेख होता. प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर सुमारे तीन महिने गावात शांतता होती आणि विक्री बंद झाली होती. मात्र, आता ऐन होळीच्या सणामध्ये हे धंदे पुन्हा राजरोसपणे सुरू झाले आहेत.
कडक निर्बंध आणि कारवाईनंतर हे धंदे पुन्हा सुरू कसे झाले, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. कोणाचेही भय उरले नसून खुलेआम दारू उपलब्ध होत असल्याने गावातील सामाजिक वातावरण बिघडू लागले आहे.
-----
कोट
गावच्या विकासासाठी आणि तरुण पिढी वाचवण्यासाठी हे अवैध धंदे मुळासकट उपटून टाकणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
- डॉ. एस. व्ही. कदम (सरपंच, कोंडगे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

