तीन लाख गुंतवून हातात पडणार १५ हजार
28824
खर्च दोन लाख, मिळणार फक्त १५ हजार
हापूसचे बिघडलेले गणित : बागायतदारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ : हापूससाठी यंदा एकरी सरासरी सुमारे दोन लाख रुपये उत्पादन खर्च आणि यंदाचे संभाव्य उत्पन्न केवळ पाच टक्के म्हणजेच १५ हजार रुपये अशी स्थिती असल्याने बागायतदारांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. दरवर्षी एकरी २ लाख खर्च करून सुमारे ३ लाखांची उलाढाल होत असताना यंदा मात्र उत्पन्नाच्या तुलनेत सरासरी सुमारे ९५ टक्के नुकसान होण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. यातूनच बागायतदारांमध्ये आक्रोश विकोपाला गेला आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि अनियंत्रित किडरोग यामुळे जिल्ह्यातील हापूस आंबा हंगाम यंदा अडचणीत सापडला आहे. नुकसान भरपाईसाठी बागायतदारांनी विविध पातळीवर शासनाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी बागायतदारांनी संघटितपणे आवाज उठवायला सुरुवात केली आहे. बागायतदारांच्या प्राथमिक माहितीनुसार, खते, कीटकनाशके, मजुरी व इतर सर्व मिळून एकरी सरासरी सुमारे दोन लाख रुपये इतका खर्च असतो. त्यामध्ये उत्तम फलधारणा झाल्यास सरासरी सुमारे तीन लाख रुपये इतकी उलाढाल होते. यंदा मात्र बागायतदारांचा सर्वसाधारण खर्च तेवढाच अर्थात दोन लाख रुपयेच झाला आहे; मात्र आलेल्या मोहोरामध्ये नरफुलांची संख्या अधिक असल्याने अपेक्षित फलधारणा झाली नाही. शिवाय कालांतराने आलेला मोहोरही काळवंडला. त्यामुळे उत्पन्न घटणार असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत सुमारे पाच टक्केच म्हणजेच सुमारे पंधरा हजारच उत्पन्न येणार असल्याचा बागायतदारांचा अंदाज आहे. त्यामुळे तुलनेत सुमारे ९५ टक्के उत्पन्न घट होण्याच्या शक्यतेने बागायतदार हवालदिल असल्याचे सांगितले जाते. बागायतदारांच्या प्रतिनिधींनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासोबत राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार नीलेश राणे, आमदार भास्कर जाधव आदींची भेट घेऊन यंदाच्या आंबा पिकावर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. यातून शासनाने बागायतदारांना अपेक्षित मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यातून काय पदरात पडणार, याची सध्या उत्सुकता आहे.
खर्चखर
चौकट
काजूही अडचणीत
जिल्ह्यातील आंबा पिकाच्या नुकसानीबरोबरच काजू बागायतदारही भरपाई देण्यासाठी मागणी करीत आहेत. आंब्याबरोबरच काजू पिकालाही भरपाई मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे. शासन यादृष्टीने काय निर्णय घेणार, हा औत्सुक्याचा विषय आहे.
कोट
swt५१२.jpg
28818
प्रशांत शिंदे
यंदा खर्चाच्या तुलनेत हापूसचे सरासरी पाच टक्केच उत्पन्न येण्याची शक्यता आहे. साधारणपणे प्रतिगुंठा एक कलम म्हणजे एकरी सुमारे ४० कलमे असतात. एकरी सरासरी सुमारे २ लाख रुपये खर्च होतो. चांगली फलधारणा झाल्यास त्याचे सुमारे ३ लाख रुपये होतात. यंदा मात्र खर्च सरासरी सुमारे २ लाखच झाला आहे; मात्र ५ टक्के म्हणजे सुमारे १५ हजार एवढेच एकरी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या तुनलेत सुमारे ९५ टक्के नुकसान होणार आहे. यासाठीच प्रतिगुंठा सुमारे ५ हजार म्हणजेच एकरी सुमारे २ लाख रुपये आणि हेक्टरी सुमारे ५ लाख रुपये भरपाई मिळण्याची बागायतदारांची शासन दरबारी मागणी आहे.
- प्रशांत शिंदे, युवा आंबा बागायतदार, कातवण, देवगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

