मळगावचा घुमट सोहळा सुरू
swt514.jpg
28830
मळगाव ः होळी उत्सवातील ‘घुमट’ सोहळ्याने परिसर भक्तिमय झाला आहे.
मळगावचा घुमट सोहळा सुरू
ढोल-ताशांचा गजर : गावात भक्तिमय वातावरण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ : तालुक्यातील मळगाव येथे होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मळगाव पंचायतन देवस्थानचे पारंपरिक ''घुमट'' बुधवारपासून (ता. ४) ढोल-ताशांच्या गजरात वाडीवस्तीवर आणि घराघरांत फिरविण्यास सुरुवात झाली. या पारंपरिक सोहळ्यात गावचे राऊळ व गावकर मानकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
धार्मिक वातावरणात सुरू झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण मळगाव भक्तिमय झाले असून, या घुमट सोहळ्याद्वारे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन होत आहे. मळगाव गावात होळीच्या तिसऱ्या दिवसापासून पंचायतन देवस्थानचे घुमट फिरविण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेनुसार, बुधवारपासून घुमट भ्रमणास सुरुवात झाली. ढोलांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या नादात गावातील प्रमुख मानकरी ठिकाणी सर्वप्रथम घुमट नेण्यात आले. त्यानंतर गावातील इतर घरांमध्ये घुमट फिरविण्यास सुरुवात झाली.
घुमटाच्या या सोहळ्यात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. यावेळी अभंग, गौळणी आणि श्रीकृष्णावरील पारंपरिक पदे गायली जात असून, त्यातून भक्तीचा सुरेल दरवळ पसरत आहे. या भक्तिगीतांमुळे आणि ढोलांच्या नादामुळे संपूर्ण मळगाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने, परंपरेनुसार घुमट सोनुर्ली येथे नेण्यात येईल. तेथील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर उद्या (ता. ६) उर्वरित वाड्यांमध्ये घुमट फिरविण्यात येईल, अशी माहिती देवस्थानच्या मानकऱ्यांनी दिली.
चौकट
एकोपा दाखवणारा देखणा सोहळा
शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा सोहळा गावातील एकोपा, श्रद्धा आणि भक्तीचे उत्तम उदाहरण मानला जातो. दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

