पालेगावच्या शिमगोत्सवात श्रद्धा, परंपरेची ऊब
- rat५p९.jpg -
P२६O२८८२६
पालेगाव : ग्रामदेवतेच्या सहाणेवर लोककला सादर करताना देवाचे खेळी.
----
पालेगावच्या शिमगोत्सवात श्रद्धा, परंपरेची ऊब
ग्रामदेवतांचा उत्सव; सानेवर लोककलांचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ : तालुक्यातील पालेगावचा शिमगोत्सव म्हणजे केवळ उत्सव नसून तो गावकऱ्यांच्या मनातील श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारा सोहळा असतो. शेकडो वर्षांची परंपरा जपत ग्रामदेवतेच्या सहाणेवर सादर होणाऱ्या लोककला आणि भक्तिभावाच्या आविष्काराने पालेगाव पुन्हा एकदा आज भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
पाले गावची ग्रामदेवता चालकोबा, खामरजा आणि जननीमाता यांच्या शिमगोत्सवाचा सोहळा परंपरेनुसार भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. गावकऱ्यांनी मंदिरासमोरील सहाणेवर देवतांची प्रतिष्ठापणा करून गावच्या वेशीवर स्थानापन्न असणाऱ्या जननीदेवीला हर हर महादेवच्या जयघोषात सहाणेवर आणण्यात आले. त्यानंतर सर्व देवतांची विधिवत पूजा करून पुजाऱ्यांच्या हस्ते ग्रामस्थांनी अर्पण केलेले नारळ समर्पित करण्यात आले.
वरची आळी, खालची आळी आणि कोंडवाडी येथील खेळ्यांनी आपापली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. भावनिक पैलू म्हणजे कविकल्पनेतून सादर झालेले वैचारिक प्रबोधन. आयुष्यातील दुःख सुखाचा अर्थ, भक्तीचे महत्त्व, गावदेवतांचे माहात्म्य आणि जुन्या परंपरांचे जतन यावर पौराणिक कथांच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले. कार्यक्रमात पोलिस पाटील वैशाली माळी, तंटामुक्त अध्यक्ष नीलेश रक्ते, पुजारी अक्षय माळी, कला पुरस्कारप्राप्त शाहीर सखाराम माळी, अनंत हंबीर यांचा मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता जयघोष करत ग्रामदेवतांना पुन्हा मंदिरात स्थानापन्न करण्यात आले. श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा सुंदर संगम घडवणारा पालेगावचा शिमगोत्सव ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे जिवंत प्रतीक ठरला.
------
चौकट
पारंपरिक खेळ्यांचे आकर्षण
शिमगोत्सवातील सर्वात आकर्षण ठरले ते पारंपरिक खेळे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही लोककला गावकऱ्यांनी तितक्याच आपुलकीने आणि श्रद्धेने जपली आहे. स्त्रीवेशात नटून थटून येणारे कलावंत, ठेक्यांवर थिरकणारा नृत्याविष्कार यामुळे रंगतदार वातावरण निर्माण झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

