''एआय'' वापरणाऱ्यांना एकत्र आणणार
swt524.jpg
28881
रवींद्र खेबुडकर
‘एआय’ वापरणाऱ्यांना एकत्र आणणार
रवींद्र खेबुडकर : नव्या गोष्टी जिल्हा परिषद स्वीकारणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ : जिल्ह्यातील ‘एआय’ वापरणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा जिल्हा परिषद लवकरच एक मेळावा घेणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद एआयच्या साहाय्याने कामकाजात साधत असलेली प्रगती आणि एआय वापरणाऱ्या संस्थांकडील माहितीचे आदान-प्रदान होणार आहे. कामकाजात काही उणिवा असल्यास त्यावर चर्चा करून, व्यक्ती किंवा संस्थांकडे एआयबाबत काही वेगळी आणि अद्ययावत माहिती उपलब्ध असल्यास ती जिल्हा परिषद स्वीकारणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज दिली.
एआयच्या वापरामुळे जिल्हा परिषद कारभारात झालेली प्रगती तसेच अन्य उपक्रमांची माहिती देण्यासाठी श्री. खेबुडकर यांनी जिल्हा परिषद सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ‘फ्रंटियर ५०’ या परिषदेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला निमंत्रित केले होते. तेथील सादरीकरणावर आणि एआयच्या माध्यमातून राबवलेल्या प्रशासकीय कामकाज पद्धतीवर केंद्र व राज्यातील प्रमुख अधिकारी तसेच देशातील निवडक ५० जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
सिंधुदुर्ग हा देशातील पहिला ‘एआय’युक्त जिल्हा ठरला आहे. जिल्हा परिषदेने एआयच्या माध्यमातून सुरू केलेल्या गतिमान कारभाराची देशभर प्रशंसा होत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांनीही एआयबाबत सजग असणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असून, प्रथम जिल्ह्यातील एआय वापरकर्त्यांना एकत्र करून त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल, असे खेबुडकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद ‘मार्वल’च्या माध्यमातून एआययुक्त ट्रेकिंग ॲप विकसित करत आहे. सुरुवातीला हा ॲप कुपोषित मुलांना सेवा देणाऱ्या यंत्रणेवर लक्ष ठेवणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कुपोषित मुलांना दिवसातून किमान एकदा भेट देणे बंधनकारक असल्याने, हे ॲप त्या भेटींची नोंद व देखरेख करेल. त्यानंतर आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक आणि शिक्षक यांच्या कामकाजावरही या ॲपद्वारे लक्ष ठेवले जाईल. हे ॲप विशेषतः क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात येत आहे.’’
चौकट
डॉक्टरांसाठी ‘चॅट बोट’
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नुकतेच शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या डॉक्टरांना अनुभवाची कमतरता असते. त्यांना मार्गदर्शनासाठी अनुभवी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. ही गरज ओळखून एक ‘चॅट बोट’ तयार करण्यात येत आहे. या चॅट बोटमध्ये नवीन डॉक्टरांना मार्गदर्शक ठरेल अशी सर्व तांत्रिक माहिती, आवश्यक व्हिडिओ आणि कार्यपद्धती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
‘सिंधुसरस’ मेळावा २१ मार्चपासून सुरू
जिल्ह्यातील बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी २१ ते २५ मार्च या कालावधीत ‘सिंधुसरस’ मेळावा भरवण्यात येणार आहे. या मेळाव्याची जागा लवकरच निश्चित केली जाईल. याचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही खेबुडकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

