पाण्याची गरज तेव्हा वीज पुरवठा तोडू नका
गरजेवेळी वीज पुरवठा तोडू नका
ग्राहकांचे निवेदन; दरवाढ, सौरऊर्जा नियमांतील गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : वीज दरवाढ प्रस्ताव, सौरऊर्जा नियमांतील निर्बंध, स्मार्ट मीटरद्वारे वीज तोडणी, बळीराजा वीज सबसिडी व हॉटेल उद्योगाच्या वीजदर वर्गीकरणाबाबत तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी ग्राहक पंचायतीने आज केली. जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मागणी ग्राहक पंचायत, आंबा बागायतदार आणि अखिल भारतीय अक्षय उर्जा संघटनेने केली. ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज असताना बागायतदारांचा वीज पुरवठा खंडित करू नका, अशीही आग्रही मागणी करण्यात आली.
ग्राहक पंचायतीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सामान्य वीज ग्राहक, सौर ऊर्जा ग्राहक, कृषी वीज ग्राहक आणि हॉटेल, पर्यटन उद्योग प्रतिनिधींनी आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) नितीन पळसुलेदेसाई यांच्याकडे निवेदने सादर केली. याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजय वैशंपायन, अविनाश काळे, राजेंद्र कदम, अनंत भडकमकर, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत हृषिकेश कोंडेकर, वसीम नाईक, शाकिब नाईक, आदी उपस्थित होते.
सौरउर्जेमध्ये १० किलोवॅटपर्यंतचे ऑटो अप्रूव्हल बंद झाले आहे. केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेनुसार १० किलोवॅटपर्यंत स्वयंचलित मंजुरी अपेक्षित असताना ती सुविधा स्पष्ट अधिसूचना न देता थांबविण्यात आली आहे. एमईआरसी नियमानुसार ग्राहकांना मंजूर लोडपर्यंत सौर क्षमता बसविण्याचा अधिकार आहे. गेल्या १२ महिन्यांच्या सरासरी वापरावर आधारित मर्यादा घालण्याचा कोणताही नियम अस्तित्वात नाही. प्रति किलोवॅट १५० युनिट उत्पादन व १०० युनिट निर्यात मर्यादा आली आहे. निर्यात मर्यादेपेक्षा जास्त युनिट्सवर ग्राहकांना वाढीव बिले देण्यात येत आहेत.
शासनाची बळीराजा वीज सबसिडी योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होती. मात्र मार्च २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शासनाने दिलेली सबसिडी इतर आकार या शीर्षकाखाली दाखवून तीच रक्कम कृषी ग्राहकांच्या थकबाकीत समाविष्ट करण्यात आली आहे.
कोट
सद्यस्थितीत हॉटेल उद्योगास व्यवसायिक वर्गवारीत समाविष्ट करण्यात आले आहे. व्यावसायिक वीजदर अत्यंत उच्च असून त्यामुळे पर्यटनप्रधान कोकण विभागातील हॉटेल उद्योगावर मोठा आर्थिक ताण येत आहे. हॉटेल उद्योग हा सेवा व रोजगारनिर्मिती करणारा उद्योग असून त्यास औद्योगिक वर्गवारीत समाविष्ट करणे आवश्यक आहे.
- कौस्तुभ सावंत, हॉटेल असोसिएशन
----
प्रमुख मागण्या
सरासरी वापरावर आधारित सौर मर्यादा रद्द करावी, १५०/१०० युनिट निर्बंध व दंडात्मक बिलिंग मागे घ्यावे, पुरेशी पूर्वसूचने शिवाय स्मार्ट मीटरद्वारे वीज तोडणी तत्काळ थांबवावी, बळीराजा वीज सबसिडी थकबाकीत दाखविणे थांबवावे व सुधारित बिले द्यावीत, २४ महिन्यांपूर्वीची वसुली रद्द करावी, हॉटेल उद्योगाला औद्योगिक वीजदर वर्गवारी लागू करावी,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

