सदर
पाक-पोषण ........लोगो
(२१ फेब्रुवारी टुडे ३ फोटोसह घ्यावे)
स्वतःच्या आहाराबाबत
महिला जागृत हव्यात
महिलांच्या आरोग्याची ही परिस्थिती पाहता समाजातील सर्व घटकांनी त्यांना पोषणयुक्त आहार घेण्यासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. ज्या समाजातील महिलांचे आरोग्य उत्तम असते आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, असा समाज कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. आपला समाज असा सज्ज आहे का?
- संगीता खरात
सहसंचालिका, सृष्टीज्ञान संस्था
---
महिला दिनाच्या निमित्ताने महिला, त्यांचा आहार आणि पोषण याबद्दल आज जाणून घेऊया. त्यासाठी सध्या महिलांची काय स्थिती आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. ‘स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड’ आणि ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे’ यांचे २०२४ मध्ये सादर झालेले अहवाल हे या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत.
भारतात जन्मत:च बाळे कमी वजनाची असतात. हे प्रमाण २७.४ टक्के असून आशियात सर्वाधिक आहे. बाळाचे कमी वजन हे गर्भवती महिलांमध्ये असलेल्या कुपोषणाचे सूचक आहे. या अहवालांनुसार भारतातील निम्म्याहून अधिक स्त्रिया (५३ टक्के) या रक्तक्षयाने (anemia) ग्रस्त आहेत. हे प्रमाण आशियात सर्वांत जास्त आहे. लहान मुले आणि महिलांमधील कुपोषण ही चिंतेची बाब असताना, हा अहवाल भारतातील लठ्ठपणाची समस्या देखील अधोरेखित करतो. महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ५०% आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात भारतात प्रत्येक दुसरी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय आहे, असे म्हटले आहे. या लठ्ठपणासह कुपोषणाशी सामना करणे हे दुहेरी आव्हान आहे.
या अहवालांमध्ये भारतातील आहाराच्या सवयींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पौष्टिक पर्यायांच्या तुलनेत चुकीच्या अन्नपदार्थांच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे अशी नोंद केली आहे. आरोग्यदायी आहार हा अधिकाधिक महाग होत चालला आहे. भारतात आज सर्वांत जास्त महागाई ही अन्नपदार्थांची आहे आणि विशेषत: ग्रामीण भागात ही महागाई अधिक आहे. कडधान्ये, डाळी, तेलबिया, भाजीपाला आणि फळे यांचे पुरेसे उत्पादन होत नाहीये. त्याचवेळी उच्च प्रक्रिया केलेले, भरपूर साखर, मीठ आणि चरबी असलेले पदार्थ स्वस्त आणि सहज उपलब्ध होत आहेत. हे सारे दीर्घकालीन कुपोषणाकडे घेऊन जाणारे आहे. भारतातील पन्नास टक्के नागरिक अशा प्रकारे कुपोषित राहणे ही राष्ट्र म्हणून खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.
यावर्षीच्या ८ मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ही ‘Give To Gain’ म्हणजेच ‘देण्यातून समृद्धी’ अशी आहे. जेव्हा व्यक्ती, संस्था आणि समाज उदारपणे योगदान देतात, तेव्हा महिलांसाठी अधिक संधी आणि पाठबळ मिळते; जेव्हा महिलांची प्रगती होते, तेव्हा समाजाची उन्नती होते, असे यातून सुचवायचे आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये, प्रादेशिक स्तरावर, स्त्रियांवरील जी बंधने आणि जे संस्कार आहेत (उदा. धर्माधारित वेशभूषा, उपवास, व्रतवैकल्ये, कुटुंबाच्या शेवटी जेवणे इ.) ते स्त्रियांच्या आरोग्याची असुरक्षितता आणि जोखीम वाढवतात. महिलांच्या आरोग्याला असलेला आणखी एक मोठा धोका म्हणजे हवामान बदल होय. ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’ (UNFCCC) द्वारे नमूद केल्याप्रमाणे, हवामान बदलांच्या परिणामांचा जास्त भार हा मुख्यत: स्त्रियांवर, विशेषत: गरीब स्त्रियांवर पडलेला दिसतो. यातच भर पडली आहे जीवनशैलीशी निगडित रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांची.
महिलांनी स्वतः सुद्धा स्वतःच्या आहाराबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला खूप पैसे लागत नाहीत, तर आवश्यकता आहे ती आपल्याच आजूबाजूला असलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांना आपल्या ताटात नव्याने जागा करून देण्याची; आणि मुख्य म्हणजे खाण्याच्या वेळा पाळण्याची. त्याची सुरुवात सकाळच्या न्याहरीपासून करावी. ही न्याहरी प्रथिनेकेंद्रित असावी. यात विविध कडधान्ये, डाळी, दूध, अंडी, मासे, मांस हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत, ज्यांचा समावेश तुम्ही न्याहरीमध्ये करू शकता. मुख्य म्हणजे तुमच्या आहारात विविधता हवी. तुम्ही घेत असलेल्या आहारात विविध रंग, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली विविध धान्ये, भाज्या, फळे यांचा समावेश असावा. ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखी आदिम धान्ये, परसात सेंद्रिय पद्धतीने उगवलेला भाजीपाला, रानभाज्या, रानमेवा, कंदमुळे हे तुमच्या रोजच्या खाण्याचा भाग बनायला हवेत. ‘Give To Gain’ हे ब्रीदवाक्य आपण आपल्या शरीराला उत्तम पोषण देऊन आरोग्याची समृद्धी मिळवण्यासाठी मनात ठसवूया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

