सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून यात्रा परिसर स्वच्छ

सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून यात्रा परिसर स्वच्छ

Published on

काही सुखद...........लोगो

विद्यार्थ्यांची यात्रेनंतर स्वच्छता मोहीम
सरफरे विद्यालयाचा पुढाकार ; शिवने-करंबेळे सीमेवर उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे मूल्य जोपासत, बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर-देवरुख राज्यमार्गावरील यात्रा परिसराची साफसफाई केली. शिवने-करंबेळे सीमेवर पार पडलेल्या पालखी भेट सोहळ्यानंतर साचलेला कचरा संकलित करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बुधवारी (ता. ४) शिवने-करंबेळे सीमेवर पालखी भेट सोहळा आणि मोठी यात्रा भरली होती. यात्रेदरम्यान रस्ते आणि परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या, कागद, अन्नाचे वेष्टन आणि इतर टाकाऊ पदार्थ साचले होते. व्यापारी निघून गेल्यानंतर सुमारे एक किलोमीटर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा हा कचरा पसरला होता.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मर्यादित संख्येमुळे एवढ्या मोठ्या परिसराची स्वच्छता करणे कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळीच या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून हे विद्यालय ही परंपरा जपून आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक आणि इतर कचरा वेचून परिसराचा कायापालट केला.
या मोहिमेदरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, शिवने गावचे सरपंच राजू पवार, उपसरपंच अमोल रसाळ, पोलीस पाटील मनोज शिंदे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-----
ग्रामस्थांकडून कौतुक
विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि श्रमाप्रति असलेल्या आदरामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘केवळ पुस्तकी ज्ञान न देता समाजाप्रति उत्तरदायित्व शिकवणाऱ्या या विद्यालयाचा आम्हास अभिमान आहे,’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com