आरोसमध्ये शिवकालीन साधन प्रदर्शन

आरोसमध्ये शिवकालीन साधन प्रदर्शन

Published on

swt68.jpg
28968
आरोस : सकल मराठा समाजाचे सीताराम गावडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. सोबत ज्ञानेश्वर राणे, आबा चिपकर, अर्जुन मुळीक, मदन मुरकर आदी.

आरोसमध्ये शिवकालीन साधन प्रदर्शन
हायस्कूलमध्ये आयोजन; विद्यार्थांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता ६ : विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाची माहिती व्हावी आणि आपला देदीप्यमान इतिहास जिवंत राहावा, या उद्देशाने आरोस विद्या विकास हायस्कूल येथे एकदिवसीय शिवकालीन साधन प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी म्हणून सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे उपस्थित होते.
याप्रसंगी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर राणे, आबा चिपकर, आरोस हायस्कूलचे संचालक सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक, मदन मुरकर, मुख्याध्यापक अनिल नाईक, तानाजी वरक, अण्णा पांचाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री. गावडे यांच्या हस्ते झाली. प्रशालेच्या वतीने सीताराम गावडे व ज्ञानेश्वर राणे यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. गावडे म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वर राणे आणि त्यांचे सहकारी शिवकालीन इतिहास जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. केवळ महाराजांसारखा पेहराव करून किंवा त्यांचे फोटो लावून कोणी ‘महाराज’ बनू शकत नाही. त्यासाठी त्यांचा इतिहास जाणून घेऊन स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. आचरण आणि परिश्रम हीच आपली खरी ओळख असते. आपली भूमी ही साधुसंतांची आहे, त्यामुळे आपल्या आई-वडिलांचा नेहमी आदर करा आणि त्यांना कधीही विसरू नका.’’
सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक, मदन मुरकर आणि विद्या विकास हायस्कूलच्या सहकार्याने हा नावीन्यपूर्ण उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. या प्रदर्शनात मराठा शस्त्रागारातील विविध साधने मांडण्यात आली होती. ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध गड-किल्ल्यांची माहिती दिली आणि शस्त्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शस्त्रे हाताळून पाहिल्यामुळे हे प्रदर्शन त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वरक यांनी, आभार मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी मानले. यावेळी शिक्षक देवयानी चव्हाण, श्रद्धा मुळीक, मिताली नाईक, कृपा नेमळेकर, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत, चेतन आरोसकर, श्रीमती मुळीक उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष नीलेश परब, सचिव राजन नाईक, सुरेश गावडे, संदीप नेमळेकर आदींनी प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com