घरोघरी-दारोदारी शिमग्याचे ''झिंगाट''

घरोघरी-दारोदारी शिमग्याचे ''झिंगाट''

Published on

swt63.jpg
28964
आचरा ः शिमगोत्सवाच्या उत्साहात गोमूच्या खेळाने रंगत वाढली आहे.

घरोघरी-दारोदारी शिमग्याचे ‘झिंगाट’
गोमूच्या खेळाने रंगत ः जमलेल्या रकमेतून सामाजिक कामांवर भर
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ६ ः ‘गोमू चल जावू गो चौपाटी बंदराला’, ‘टिमक्याची चोळीबाय रंगान फुलैली’, ‘दाताचे दातवन घ्या गं कुणी, कुंकू घ्या, कुणी काळं मणी’ यांसारख्या पारंपरिक गीतांबरोबरच ‘आता एकची राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर’ यांसारख्या स्फूर्तिगीतांच्या सहाय्याने गोमूचे खेळ रंगात आले आहेत. सिंधुदुर्गात शिमगोत्सवाचा ‘झिंगाट’ वाढू लागला आहे. यातच गोमू खेळातून मिळणाऱ्या पैशाचा वापर मौजमजेसाठी न करता समाजकार्यासाठी करत बांधिलकी जपली जात आहे.
शिमगोत्सव म्हटला की खेळ आलेच, पण पूर्वी वारेमाप येणारे गोमूचे नाच मधल्या काळात दुर्मीळ बनले होते. बच्चे कंपनीही यापासून दूरच गेल्याचे जाणवू लागले होते. त्यामुळे गोमू खेळ बघण्यासाठी आसुलेल्यांना सोशल मीडियावरील व्हिडिओवरच समाधान मानावे लागते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती, पण यावर्षीच्या शिमगोत्सवात ती उणीव भरून काढत छोट्या चमूपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच या नाचगाण्यांत रमल्याचे दिसून येत आहेत. देवूळवाडी, पुजारेवाडी येथील बच्चे कंपनी असो की डोंगरेवाडी पारवाडी, बालगोपाळ मंडळाचे कलाकार असो, गोमूचे खेळ सादर करत शिमगोत्सवाची रंगत वाढवत आहेत.
आचरा वरचीवाडी येथील बालगोपाळ मंडळ, पारवाडी मंडळाचे युवा वर्ग गोमूचे खेळ काढून मनोरंजनाबरोबरच यामधून मिळणाऱ्या पैशातून वाडीतील विकासकामे करत आहेत. विविध पात्रांसोबत गोमू बनलेले युवक सामाजिक जाणिवेतून एकत्र येत आहेत. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्येष्ठ मंडळीही सहभागी होऊन गोमू खेळाचा उत्साह वाढवित आहेत. याअगोदरही देवूळवाडी घाडी मंडळाकडूनही शिमगोत्सवातील खेळ काढून आपल्या भागातील विकासकामे केली होती. गोमू खेळातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मंडळांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com