अभंग गायन स्पर्धेचे आरोसला आयोजन
अभंग गायन स्पर्धेचे
आरोसला आयोजन
सावंतवाडी : आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमीनिमित्त श्री देव गिरोबा नाट्यमंडळातर्फे जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये १५ वर्षांपर्यंतचा बालगट व १५ वर्षांवरील खुला गट असे दोन विभाग असतील. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी १२ मार्चपर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. स्पर्धकांनी मराठी भाषेतील संतरचित अभंग सादर करणे अनिवार्य आहे. अभंग चित्रपटगीतांच्या चालीवर नसावा. स्पर्धकांना सादरीकरणासाठी ५ ते ८ मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धेसाठी आवश्यक संगीत साथसंगत आयोजकांमार्फत पुरविली जाईल. स्पर्धकांनी तबला व हार्मोनियमच्या साथीने आपल्या आवाजातील ३ ते ४ मिनिटांचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर १२ मार्चपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. यात आकर्षक बक्षिसे आहेत.
....................
‘सुपारी नुकसानीची
भरपाई त्वरित द्या’
सावंतवाडी ः ऑगस्ट-२०२२ मध्ये सुपारी पिकावरील ‘कोळे’ रोगामुळे बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच्या पंचनाम्यासाठी सूचनाही दिल्या होत्या. त्याप्रमाणे कृषी विभागाने पाहणी करून पंचनामेही केले. मात्र, साडेतीन वर्षे उलटून अद्यापही सुपारी बागायतदार भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. मागणीची तत्काळ दखल घेऊन भरपाई मिळावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा संघटना व शेतकऱ्यांनी सावंतवाडीतील उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. निवेदनावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शामसुंदर कृष्णा राय, प्रणव नाडकर्णी, आग्नेल फर्नांडिस, उत्तम नाईक, प्रदीप सावंत, रामकृष्ण चिचकर, प्रकाश वारंग, महेश चव्हाण (सचिव), मेघःश्याम भगत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
......................
सावंतवाडीत रविवारी
गीत, नाट्य गायन
सावंतवाडी ः सावंतवाडी संगीत मित्रमंडळातर्फे रविवारी (ता. ८) येथे गीत गायन, नाट्य गायन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम अतुल माईणकर यांच्या सबनीसवाडा येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. हार्मोनियमवादक सुरेश मेस्त्री व रघुनाथ ऊर्फ बाबी मेस्त्री यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा संगीत श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमात त्यांचे विद्यार्थी व सहकारी सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमास संगीत साथ/हार्मोनियम नीलेश मेस्त्री, किरण सिद्धये, तबलासाथ किशोर सावंत, नीरज भोसले व साहिल चोचे सांभाळणार आहेत. रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केले आहे.
......................
सावंतवाडी येथे
वधू-वर मेळावा
वेंगुर्ले ः गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग या संस्थेचा वार्षिक ज्ञातिबांधव स्नेहमेळावा व वधू-वर परिचय मेळावा १५ मार्चला मांगिरिश बनक्वेट हॉल, सावंतवाडी येथे आयोजित केला आहे. या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, तर विशेष पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती तथा नवनिर्वाचित सदस्य प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तसेच ज्ञातीतील एका व्यक्तीचा ‘सारस्वत मित्र’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. सुधीर झांट्ये यांच्याकडे १० मार्चपर्यंत नावे पाठविणे गरजेचे आहे. वधू-वर नोंदणीसाठी अनंत खंडाळेकर यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सचिव वैभव केंकरे यांनी केले आहे.
----
केळूस येथे रविवारी
‘महिला आनंदमेळा’
म्हापण ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ८) नवभारत विद्यालय केळूस क्र. १ च्या सभागृहात दुपारी २ वाजता ग्रामपंचायत केळूस कार्यक्षेत्रातील सर्व मुली व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व फनीगेम्सचा समावेश असलेल्या ‘महिला आनंदमेळा’चे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत केळूस, संजीवनी ग्रामसंघ केळूस आणि ज्ञानवृद्धी ग्रामोत्कर्ष मंडळ वाचनालय, केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
.....................
कवठणीत १३ पासून
‘भगवा चषक’ स्पर्धा
सातार्डा ः कवठणी येथील काजरोबा स्पोर्टस् अॅन्ड कल्चरल क्लबकडून १३, १४ व १५ मार्चला सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित पंचायत पातळीवरील भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्या संघाला ६६,६६६ रुपये, उपविजेत्या संघाला ३३,३३३ रुपये, तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्या १६ संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक संघांनी मंडळाचे कार्यकर्ते मुन्ना कवठणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

