

29017
पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणार
डॉ. प्रशांत परांजपे ; ‘कृती आराखडा’ जिल्हा परिषदेला सादर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ६ ः रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजल पातळी आणि भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेता, जलप्रेमी व पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत परांजपे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे एक सविस्तर ‘कृती आराखडा’ सादर केला आहे. ५ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हा आराखडा देण्यात आला असून, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्यावर यात भर देण्यात आला आहे.
डॉ. परांजपे यांनी सादर केलेल्या आराखड्यात मार्च ते मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करण्याचे उपाय सुचविले आहेत. हा आराखडा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी गावपातळीवर स्वच्छाग्रही, जलसेवक, जलकर्मी, युवक मंडळे आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा सहभाग आवश्यक असल्याचे डॉ. परांजपे यांनी नमूद केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून त्यांनी विविध ग्रामपंचायतींना भूजल साठा वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. या आराखड्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी वाया जाऊ न देता ते जमिनीत झिरपवणे किंवा साठवणे यावर विशेष भर दिला आहे. यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
-----
चौकट
हे आहे वेळापत्रक
आराखड्यानुसार शाळा, दवाखाने, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींच्या इमारतींवरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची कामे १५ मार्चपर्यंत पूर्ण करावीत. बहुमजली इमारतींमध्ये १६ ते ३० मार्च या कालावधीत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था उभारण्याची कामे केली पाहिजेत. प्रत्येक घरातील छतावरील पाण्याचे संवर्धन करण्यासाठी व्यापक जनजागृती व अंमलबजावणी करण्यासाठी १ ते २० एप्रिल हा कालावधी त्यांनी निश्चित केला आहे. २० एप्रिल ते १० मे या कालावधीत गावातील नद्या, नाले आणि सार्वजनिक विहिरींची गाळमुक्ती करून पुनर्भरणाचे नियोजन करावे. तसेच झालेल्या कामांचे पुनर्सर्वेक्षण करून राहिलेल्या त्रुटी ११ ते १५ मे या कालावधीत दूर करता येतील, असे आराखड्यात नमुद केले आहे.
कोट
‘‘जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी आतापासूनच नियोजित पावले उचलणे गरजेचे आहे. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास भविष्यातील जलसंकट टाळता येईल.’’
- डॉ. प्रशांत परांजपे, जलप्रेमी व पर्यावरण अभ्यासक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.