सोनवडे घाटमार्गाला ‘पर्यावरण’ची मंजुरी

सोनवडे घाटमार्गाला ‘पर्यावरण’ची मंजुरी

Published on

सोनवडे घाटमार्गाला ‘पर्यावरण’ची मंजुरी

नव्याने होणार जनसुनावणी; भूसंपादनानंतरच कामाचा श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ ः घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटला आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी तज्‍ज्ञांनी डिसेंबर-२०२५ मध्ये मंजुरी दिली. त्‍यानंतर केंद्रीय पर्यावरण समितीनेही प्रस्तावित घाटमार्गाला मंजुरी दिली आहे; मात्र घाटमार्गाची रचना बदलल्‍याने घाटमार्ग जात असलेल्‍या गावांमध्ये जनसुनावणी होणार आहे. याशिवाय घाटमार्गामध्ये नव्याने बाधित होणाऱ्या खासगी जागेचे संपादनही करावे लागणार आहे. ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर घाटमार्गाचा अंतिम ‘डीपीआर’ तयार होईल. त्‍या‘ डीपीआर’ला पुन्हा आयआयटी, मुंबईच्या स्थापत्य विभागाकडून ‘ना-हरकत’ मिळणे आवश्‍यक आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर या घाटमार्गाची निविदा निघून प्रत्‍यक्ष रस्ताकाम सुरू होणार आहे. त्‍यासाठी अद्यापही दीड ते दोन वर्षे कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.
१९८० च्या सुमारास दिवंगत प्रा. महेंद्र नाटेकर यांच्यासह सोनवडे, घोटगे आणि जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांनी सोनवडे घाटमार्गासाठी आंदोलने सुरू केली. त्यानंतरच्या ४५ वर्षांत केंद्रीय वन्यजीव विभाग, पर्यावरण विभाग, वन विभाग आदींची सर्वेक्षणे झाली. वनविभागाला पर्यायी वनजमीन देण्यात आली. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर २०२१ मध्ये घाटमार्ग तयार करण्यासाठी निधी मंजूर होऊन निविदाही निघाल्‍या. प्रत्‍यक्ष रस्ताकाम सुरू करताना मात्र या घाटरस्त्याचे अलायमेंट चुकीचे असल्‍याचे निष्पन्न झाले. त्‍यामुळे घाटमार्गासाठी तब्‍बल ४० वर्षे सुरू असलेला लढा, तसेच सार्वजनिक बांधकाम, वनविभाग आणि इतर खात्‍यांची मेहनत वाया गेली. २०२१ मध्ये सोनवडे घाटमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. मोनार्च कंपनीने २०२३ मध्ये आखणी केलेल्‍या नव्या मार्गाचा अहवाल राज्‍याला सादर केला. यात घाटमार्गाची लांबी १० किलोमीटरवरून १३.३४ किलोमीटर झाली. त्‍यामुळे वाढीव ६ किलोमीटर अंतरासाठी नव्याने भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. घाटमार्गाची नव्याने आखणी केल्‍याने केंद्रीय वन्यजीव मंडळ, व्याघ्र प्रकल्‍प आणि पर्यावरण विभागाकडून नव्याने सर्वेक्षण आणि त्‍यांची मंजुरी मिळणे आवश्‍यक झाले. त्‍याअनुषंगाने वन्यजीव, पर्यावरण, व्याघ्र प्रकल्‍प आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी, सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसमवेत मार्च-२०२५ मध्ये नव्या घाटमार्गाची पाहणी केली. यात एकूण पाच पर्यायांपैकी कमी चढण असलेला प्रस्ताव स्वीकारला, तर २९ जानेवारीला वन्यजीव, व्याघ्र प्रकल्‍प आणि पर्यावरण विभागाने घोटगे-सोनवडे नव्या घाटमार्गाच्या कामाला मंजुरी दिली.
दरम्‍यान, नव्या घाटमार्गामध्ये उभारले जाणारे छोटे-मोठे पूल, वन्यप्राण्यांच्या मुक्‍त संचारासाठी अंडरपास, ओव्हर पास आदींच्या अनुषंगाने आयआयटी, पवई-मुंबईच्या अभियांत्रिकी पथकानेही सप्टेंबर-२०२५ मध्ये घोटगे, सोनवडे आणि जांभळगाव या गावांमध्ये जाऊन घाटमार्गाच्या नियोजित रस्ता संरचनेची प्रत्‍यक्ष पाहणी केली होती. या अभियांत्रिकी तज्‍ज्ञ समितीनेही १० डिसेंबर २०२५ ला नव्या घाटमार्गाच्या रचनेमध्ये काही सुधारणा करण्याचे निर्देश देऊन घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटला मंजुरी दिली आहे. त्‍याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
.......................
नव्याने होणार जनसुनावणी
घोटगे-सोनवडे घाटमार्गामधील गावांमध्ये ऑक्‍टोबर २०१६ ते जानेवारी २०१७ मध्ये जनसुनावणी झाली होती; मात्र आता घाटमार्गात ६ किलोमीटरचे क्षेत्र वाढले आहे. त्‍यामुळे शिवडाव खुर्द, शिवडाव बुद्रुक, विंजोळे (सर्व ता. कोल्‍हापूर) आणि सिंधुदुर्गातील घोटगे, सोनवडे तर्फ कळसुली, घाडीगाव आणि दुर्गानगर या गावांमध्ये जनसुनावणी होणार आहे. या सुनावणीचा अहवाल आणि अंतिम पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण समितीकडे सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या सादरीकरणानंतर केंद्रीय पर्यावरण समिती घाटमार्गाला अंतिम मंजुरी देणार आहे. या मंजुरीनंतरच घाटमार्गासाठी राज्‍याकडून निधीची तरतूद होऊन निविदा प्रक्रिया सुरू होईल. तसेच प्रत्‍यक्ष घाटमार्गाचे काम सुरू होणार आहे. त्‍यासाठी आणखी दीड ते दोन वर्षे कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.
......................
६०० कोटींचा खर्च अपेक्षित
घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटनंतर सर्व प्रकारच्या परवानगींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच या घाटमार्गासाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्‍याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात आला. दरम्‍यान, हा घाटमार्ग सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून, या घाटमार्गालगतची गावे विकासाच्या टप्प्यावर येणार आहेत.
--------------------
कोट
घोटगे-सोनवडे घाटमार्ग पूर्ण होण्यासाठी तब्‍बल ४५ वर्षे प्रतीक्षा लागून राहिली आहे. नव्या अलायमेंटमुळे या घाटमार्गाचे काम लांबणीवर गेल्‍याचे बांधकाम अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी तातडीने हा घाटमार्ग पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे.
- भूषण कारेकर, शिवडाव ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com