काजू नुकसानीचा संयुक्त सर्व्हे

काजू नुकसानीचा संयुक्त सर्व्हे

Published on

28989

काजू नुकसानीचा संयुक्त सर्व्हे

प्रशासनाकडून पाऊल; शास्त्रज्ञ, हवामानतज्ज्ञ, ‘कृषी’चा समावेश

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ६ : जिल्ह्यातील काजू पिकाचा मोहोर करपल्यामुळे उत्पादक अडचणीत आले आहेत. त्या अनुषंगाने शास्त्रज्ञ, हवामानतज्ज्ञ आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाकडून काजू बागांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. कणकवली, वैभववाडी तालुक्यांतील अनेक मंडलांतील बागांची या पथकाने पाहणी केली असून, उर्वरित भागांतील नुकसानीची पाहणी हे पथक करणार आहे.
जिल्ह्यात आंब्याप्रमाणे काजू पिकाचा देखील मोहोर करपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के देखील उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे काजू पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी अडीच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी सातत्याने मागणी केली आहे. या मागणीसाठी काही ठिकाणी आंदोलने झाली असून, पुढील काही दिवसांत आणखी आंदोलने होण्याची शक्यता आहे. तेव्हा, शासनाने काजू पिकाच्या नुकसानीची संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मंडलांमध्ये अधिकाऱ्यांचे पथक जाऊन नुकसानीचे सर्वेक्षण करणार आहे. दोन-तीन दिवसांपासून ही पथके सर्वेक्षण करत आहेत.
गुरुवारी (ता. ५) वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. वाय. आर. गोवेकर, मुळदे संशोधन केंद्राचे हवामानतज्ज्ञ यशवंत मुठाळ, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, कणकवली तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहळ आणि वैभववाडी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख या पथकाने कणकवली, वैभववाडी तालुक्यांतील विविध मंडलांतील काजू बागांची पाहणी केली. पुढील दोन दिवस उर्वरित तालुक्यांत हे पथक पाहणी करणार असून, त्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल.
..........................
फळपिकांसाठी धुके डोकेदुखी
जिल्ह्यात सध्या प्रचंड धुके पडत आहे. धुक्यामुळे परागीकरणाची मोठी समस्या निर्माण होऊन मोहोर करपत आहे. परागीकरणासाठी सकाळचे वातावरण उपयुक्त असते; मात्र याच काळात धुक्यामुळे मधमाश्या आणि परागीकरणासाठी आवश्यक इतर कीटक झाडांवर येत नाहीत. याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला असून आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com