सिंधुदुर्गात उद्यापासून ''एचपीव्ही'' लसीकरण
सिंधुदुर्गात उद्यापासून
‘एचपीव्ही’ लसीकरण
रवींद्र खेबुडकर ः १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेचा प्रारंभ रविवारी (ता. ८) महिला दिनी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व १४ वर्षे वयोगतातील मुलींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे.
एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय प्रारंभ २८ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यात ही मोहीम पालकमंत्री नीतेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. केंद्र व राज्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी सीईओ खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक काल (ता. ५) जिल्हा परिषद येथे झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुधीर धनगे आदी उपस्थित होते.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय स्तरावर ही मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ही मोहीम एकूण ९० दिवस (तीन महिने) चालणार आहे. ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ज्यांना १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत, अशा सर्व मुली या लसीकरणासाठी पात्र असतील. ही लस केवळ आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र), ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असेल. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ अशी निश्चित केली आहे. पालकांना आपल्या मुलींची नोंदणी ‘यू-विन’ पोर्टलवर स्वतः करता येईल किंवा आरोग्य केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. हे लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. अधिक माहितीसाठी ‘१०४’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

