गर्भवतीसाठी रुग्णवाहिकेचा चालक ‘देवदूत’

गर्भवतीसाठी रुग्णवाहिकेचा चालक ‘देवदूत’

Published on

29243
शंकर पार्सेकर

गर्भवतीसाठी रुग्णवाहिकेचा चालक ‘देवदूत’

मळेवाड येथील तत्परता; तत्काळ वैद्यकीय सेवा

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ७ : दुर्गम भाग, रस्ता नसलेले जंगल आणि रात्रीची दहाची वेळ... त्यात वेळेचे आणि खडतर प्रवासाचे मोठे आव्हान.. अशा कठीण परिस्थितीत मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिकेचे चालक शंकर पार्सेकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे, एका ८ महिन्यांच्या गर्भवतीसह पोटातील बाळाचे प्राण वाचले आहेत. त्यांच्यासाठी तो जणू ‘देवदूत’ ठरला. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मळेवाड-आजगाव सीमेजवळील राजगड येथील चिरेखाणीवर काम करणाऱ्या एका कामगाराची पत्नी, जी ८ महिन्यांची गर्भवती आहे, ती अचानक बेशुद्ध पडली. यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. खाण परिसर जंगलमय आणि दुर्गम भागात असल्याने तिथे साध्या वाहनांना जाणेही अत्यंत कठीण होते. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच १०२ रुग्णवाहिकेचे चालक शंकर पार्सेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले. जंगलमय भागातून वाट काढत, चिरेखाणीकडे जाण्यासाठी सुस्थितीत रस्ता नसतानाही, पार्सेकर यांनी कौशल्याने रुग्णवाहिका थेट संबंधित गर्भवतीपर्यंत पोहोचवली. संबंधित महिला बेशुद्ध असल्याने तिची प्रकृती अधिकच चिंताजनक होती. पार्सेकर यांनी तत्काळ तिला रुग्णवाहिकेत घेऊन, ऑक्सिजन लावून तातडीने मळेवाड आरोग्य केंद्रात दाखल केले.
---
सतर्कतेमुळे जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव
येथे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम मस्के आणि डॉ. अदिती ठाकर यांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले. योग्यवेळी ऑक्सिजन मिळाल्याने आणि वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे गर्भवतीची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. वेळेचे महत्त्व ओळखून कठीण परिस्थितीत धाडस दाखवणाऱ्या शंकर पार्सेकर यांच्या कामगिरीमुळे गर्भवतीला तत्काळ वैद्यकीय सेवा मिळाली. आरोग्य विभागाच्या या सतर्कतेबद्दल स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com